मित्रहो,
मनोगत हे आपले आवडते संकेतस्थळ उत्कृष्ठ नको, उत्कृष्टच हवे.
मनोगतीला आपली आवड लक्षात घेऊन वैयक्तीकरण करता यावे अशी सोय असावी, हे मी मागे प्रशासकांना मी कळवले होतेच. मनोगतीला आवडतात असे विषय, लेख, लेखक ह्यांच्यावर त्याची सहज नजर रहावी, जावी ह्यासाठी हे आवश्यक आहे.
पहिले पान अधिक आकर्षक व्हावे. देखणेपणाच्या दृष्टीने नव्हे तर आशय आणि मजकुराच्या दृष्टीने. माझ्या काही सुचवण्या -
१. महाराष्ट्रातील प्रमुख गावांचे तापमान, हवामान यांची नोंद असावी, वैयक्तीकरण असावे.
२. पहिल्या पानावर बातम्यांचे सार असावे.
३. पहिल्या पानावर आजचा सुविचार, आजचा शब्द असावा.
४. प्रशासकीय मंडळाबाबत पारदर्शकता असावी. किमान त्यांची नावे उघड असावीत.
६. मनोगतावर प्रकाशनासाठी खुला आणि निवडक असे दोन गट असावेत.
७. निवडक साहित्याचा गटात मजकुराची निवड करण्यासाठी ते खुल्या गटात प्रकाशित करता येणार नाही, अशी तरतूद असावी. आणि निवडक साहित्याच्या गटासाठी संपादकीय विभाग सुरू करण्यात यावा.
८. मनोगताने महिन्याकाठी विशेष पुरवण्या काढाव्यात.
९. संपादकीय आणि प्रशासकीय धोरण स्पष्ट करण्यात यावे. संपादकीय आणि प्रशासकीय मंडळावर वेगवेगळ्या विचारसरणीच्या मनोगतींचे प्रतिनिधित्व असावे. निष्पक्षता केवळ असू नये ती दिसावीही.
१०. मनोगतावरील निवडक साहित्याचे, लेखांचे, कृतींचे संकलन करून एक वार्षिकांक प्रकाशित करण्यात यावा. ह्या वार्षिकांकासाठीच्या साहित्याची निवड गैरमनोगतींकडून व्हावी.
११. मराठीतल्या जुन्या, दर्जेदार ग्रंथाचे, वाङ्मयाचे ई-ग्रंथालय सुरू करण्यात यावे.
१२. संस्कृत किंवा इतर भाषा शिकण्यास उत्सुक असलेल्या मनोगतींसाठी तसे शिकवणी वर्ग सुरू करण्यात यावेत.
सध्यासाठी एवढ्या सुचवण्या पुरे असाव्यात. काही सुचवण्या वादग्रस्त आहेत. पण वाद झेलल्याशिवाय मनोगताला जिवंतपणा येईल कसा?
चित्तरंजन भट