दोन माणसांमधला संवाद फक्त शब्दानीच होत नाही तर बोलणाराच्या चेहऱ्यावरचे हावभाव, शारीरिक हालचालींच्या लकबी व आवाजातले चढ उतार यातूनही होत असतो. या शब्दांपलीकडल्या गोष्टी ऐकणाऱ्याला बरंच काही सांगतात. असं म्हणतात की शब्द फक्त दहा टक्के अर्थ पोचवतात. त्यामुळे बोललेल्या शब्दांमधून अनेक अर्थ निघत असले तरी इतर गोष्टींमुळे बोलणाराला अभिप्रेत असलेला अर्थ ऐकणाराला बरोब्बर समजतो.
याबाबत एक उदाहरण : जेव्हा एखाद्या माणसाला वेळ काय झाली ही माहिती पाहिजे असते तेव्हा तो दुसऱ्याला साध्या आवाजात "किती वाजले? " असं विचारतो. दुसरा माणूस त्याला वेळ सांगतो. पण ठरलेल्या वेळी संध्याकाळी घरी न येता नि अगोदर न सांगता रात्री उशीरानी घरी येणाऱ्या मुलाला/मुलीला वडील आवाज चढवून "किती वाजले? " असं विचारतात तेव्हा त्यांना मुलगा/मुलगी वेळ सांगत नाही. शब्द तेच पण अर्थ वेगळा. तो संबधित ऐकणारांना बरोबर कळतो.