या विषयावर 'मनोगत'वर आणि 'मनोगत'बाहेर अनेकवेळा चर्चा-चर्वण झालेले आहे. निष्पन्न शून्य.
मुक्तछंदाच्या नावाखाली मराठी वाचकांवर "मोकाट"छंदातील अनेक "रचना" (कविता शब्द मुद्दामून टाळलेला आहे. ) "पाडल्या" आणि "खपवल्या" जात आहेत.
हा वाचास्वातंत्र्याचा सर्वोच्च दुरुपयोग आहे असे वाटते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. जेव्हा स्वातंत्र्य येते तेव्हा त्याबरोबर नियम पाळण्याची जबाबदारी सुद्धा येते असे वाटते.
कविता हा साहित्यातील एक उत्कृष्ट प्रकार आहे. पण त्याचे पुरणपोळीसारखे आहे. जमली तर उत्तम, नाहीतर कणकेचा गोळा.
पुरणपोळीतला महत्त्वाचा भाग म्हणजे पुरण. पण त्याला मऊ लुसलुशीत आणि छान तिंबलेली कणीक हवी. आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी सम आणि योग्य प्रमाणात भाजलेली हवी. आणि लाटताना किंवा भाजताना पोळी फाटायला किंवा फुटायला नको. हे सर्व जमून आले तर पुरण पोळी छान झाली असे आपण म्हणतो.
तसेच कवितेचे आहे असे वाटते. एखाद्या कवितेतील कविकल्पना हे त्यातले पुरण. त्या जोडीला वृत्त, छंद, यमक यांची कणीक आणि नियमांच्या तव्यावर भाजून घेतली की मग उत्तम कविता बनते असे वाटते.
बाकी काय म्हणा, शेवटी ज्याला जे पाहिजे ते तो करणारच. रचनाकार काहितरी लिहून लेखकांच्या माथी मारणार असतील तर वाचकही सदरहू लेखन वाचण्यास अथवा त्यावर भेळ खाण्यास मोकळे आहेतच.