हल्ली दूरचित्रवाणीवरून जे मराठी ऐकू येते ते बरेचसे हिंदी किंवा इंग्रजीचे भाषांतर असते.-
भाषांतर आहे म्हणून ते कृत्रिम वाटते असे नसून अनेकदा शब्दशः भाषांतर असते म्हणून खुपते. काय योग्य आहे याची जाणीव आहे म्हणून खुपते. कुठला शब्द वापरणे जास्त योग्य आहे, वाक्यरचना कशी करायची हे या सर्व बाबी दहावी झाली की गौण होतात, लेखक व्हायचे नाही, या भाषेत पुढे काही शिकायचे नाही मग काय गरज आहे हे सर्व लक्षात ठेवण्याची ही एक वृत्ती बळावत जाते. पण इंग्रजीबाबत असे होत नाही याची कारणे तेवढीच स्पष्ट आहेत.
साहेबाची भाषा बोलतांना, लिहितांना सर्व नियम पाळून लेखन करतो, बोलतो, पण व आपल्या भाषेबद्दल हीच जाणीव मनात ठसलेली नाही असेच मला वाटते. प्रसारमाध्यमात ही अशी जाणीव नसलेली, काय बिघडत, भा. पो असे मत असणाऱ्यांची संख्या जास्त असावी म्हणूनच अशी भाषा आढळते, फोफावते. शहरातल्या मराठी घरांमध्ये काय वेगळ आढळत? आजीआजोबा, पालक आणि शाळेत जाणारी मुले या पिढ्यांचे मराठी कसे आहे याकडे बघितले तर थोडेफार असेच चित्र दिसेल.
प्रसारमाध्यमांमुळे समाजाची भाषा तयार होते , खूप बदलते असे मला वाटत नाही. शाळेत , पुस्तकात , अभ्यासक्रमात अशी मराठी नसते. मी प्रत्येक भाषा तिचे नियम पाळून वापरेन ही जाणीव अंगात न भिनल्याने कालांतराने सगळीकडेच हिंदी / इंग्रजीचा प्रभाव असणारे मराठी दिसेल हे नाकारता येत नाही. कुठास ठाऊक आणखी दहा वीस वर्षांनी हे नवे मराठी प्रमाणित मराठी म्हणून स्वीकारले जाईल.
भाषांतरापेक्षा एक दुसरा मुद्दा माझ्या डोक्यात अनेक दिवसांपासून आहे तो म्हणजे ही सर्व मंडळी इंग्रजी / हिंदीतच विचार करतात आणि त्यानुसार फक्त लेखन मराठी करतात. अनुवाद किंवा भाषांतर केले असते तर कदाचित जास्त लक्ष देऊन, काटेकोरपणे केले असते असे मला उगीचच वाटतेः) कारण अनुवाद कसा करायचा हे ते शिकले असतील असा एक माझा भाबडा समज आहे.
बातम्या, निवेदन यामध्ये भाषेचे निकष आणि नाटक कथा, मालिका याबद्दल अपेक्षित असणारे भाषेचे निकष वेगळे आहेत. बातम्या , निवेदन यात प्रमाणित मराठीची अपेक्षा योग्यच आहे. पण इतर ठिकाणी स्थळकाळ, पात्रे, त्यांचे अनुभवविश्व यावर भाषा अवलंबून असणे गृहित धरले आहे. हे तरी या प्रसारमाध्यमात पाळले जाते का? उत्तर नाही असेच आहे.
पुस्तके, वर्तमानपत्रे ही माध्यमे त्यामानाने अजून दूरचित्रवाणीपेक्षा बरीच बरी आहेत.
आता यावर उपाय काय? केवळ चुका दाखवल्या तरी चुका मान्य होत नाहीत. चुका मान्य झाल्या तरी मी असेच वागणार हा ताठा मोडता येत नाही. त्यापलिकडे जाऊन उपाययोजना करणारे जेव्हा दूरचित्रवाणी / समाज/ प्रसारमाध्यमात अधिकाधिक दिसतील तेव्हा ही परिस्थिती बदलू शकेल.
माझ्या लेखनात चुका शोधते, त्यातल्या काही मी सुधारते , सहकाऱ्याशी चर्चा करून इतर चुका कमी करण्याचा प्रयत्न करते. हीच जाणिव खोलवर झिरपत जाईल तसे लेखन बदलेल अशी मला आशा वाटते. अशी जाणिव असणारी माणसे वाढवण्याकरता काही सकारात्मक उपाय सूचत असतील तर त्यावरही चर्चा व्हावी.