मी प्रत्येक भाषा तिचे नियम पाळून वापरेन ही जाणीव अंगात न भिनल्याने कालांतराने सगळीकडेच हिंदी / इंग्रजीचा प्रभाव असणारे मराठी दिसेल हे नाकारता येत नाही. कुठास ठाऊक आणखी दहा वीस वर्षांनी हे नवे मराठी प्रमाणित मराठी म्हणून स्वीकारले जाईल.
असेच होईल असे मला वाटत आहे पण सुदैवाने ते माझ्या हयातीत होईल असे मात्र वाटत नाही!
एकूणच कोणतीही भाषा आपल्याकडून जास्तीत जास्त शुद्ध लिहिली जावी असे अगदी 'आतून' वाटणारी माणसे हल्ली कमी आढळतात. 'काय म्हणायचं आहे ते समजलं म्हणजे झालं' ह्या युक्तिवादाला सध्या तरी माझ्याजवळ काही उत्तर नाही.
थोडे विषयांतर करून एक सत्य घटना सांगत आहे. पूर्वी दूरदर्शनवर दर रविवारी एकेका प्रादेशिक भाषेतील पुरस्कृत चित्रपट दाखवत असत. अर्थातच इंग्रजीत भाषांरित केलेले संवाद/ गीते चित्रांवर लिहून येत असत. एका मराठी चित्रपटात 'तू वाघ्या, मी तुझी मुरळी' ह्यापैकी 'मी तुझी मुरळी' चे I am your flute असे भाषांतर केले होते! हे का झाले असेल हे समजायला मला एखाददुसरे मिनिट लागले. 'तू वाघ्या' चे you tiger केले नाही ह्यातच मी समाधान मानून घेतले!