इंग्रजी बोलताना व लिहिताना त्या सुंदर भाषेवरही इये मराठीचिये देशी तितकेच अत्याचार केले जातात. इंग्रजीवर बोलणाऱ्याचे व ऐकणाऱ्याचे प्रभुत्व सारखेच बेताचे असले तरी अज्ञानात सुख असल्यामुळे (व स्वतःविषयी फाजील आत्मविश्वास असल्यामुळे) हा संवाद "ठोकुनी देतो ऐसा जे" चालतो. बोलण्याचे सोडा, आजकाल इंग्रजी वर्तमानपत्रातील इंग्रजीची दुर्दशा पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. फरक इतकाच आहे की मराठीत आपण चुका करतो हे संबंधितांना मान्य असते पण त्याची फिकीर नसते, परंतु इंग्रजीत काही चुका होत असतील हेच त्यांना अमान्य असते.
शिरीष कणेकरांच्या एका ध्वनिफितीतील वाक्य आठवले : आपल्याला माहीत नाही हेच मुळी त्यांना माहीत नसतं.