परभाषेतील वाक्प्रचारांचे शब्दशः व त्यामुळे अर्थशून्य भाषांतर हा आणखीन एक वारंवार खुपणारा काटा. उदाहरणे अनेक आहेत पण एकच देतो. गेल्या वर्षी कपडे धुण्याच्या कुठल्यातरी पावडरची जाहिरात दूरचित्रवाणीवर प्रसारित केली जायची. सुरुवातीला हिंदीत हिंदी वाहिन्यांवर येणारी ही जाहिरात कालांतराने "मराठी" अवतारात मराठी वाहिन्यांवरही झळकू लागली.इथे 'अवतार' हा शब्द "काय पण अवतार आहे!" ह्या अर्थाने घ्यावा कारण हिंदीतील "दाग का काम तमाम" हे वाक्य माय मराठीत "दागांचे (डागांचे नव्हे! ) काम पूर्ण" असे हास्यास्पद रूप घेऊन अवतरले होते! 
    'काम तमाम करना' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ मारून टाकणे किंवा, ह्या जाहरातीच्या संदर्भात, नष्ट करणे असा आहे. पण शब्दाला मराठी प्रतिशब्द ठेवण्यास अनुवाद समजणाऱ्याला अशा बारकाव्यांचे काय?