लिहिताना अकारण बोलीभाषा वापरली की चुका होण्याची शक्यता वाढते. उदा० वरील प्रतिसादात तीनदा आलेला आपणचं हा शब्द. 'च'वर वा 'ण'वर अनुस्वार यायचे काही कारण नव्हते.
आले, आपले, ठरवले, मुले हे शब्द एकारान्त लिहायला पाहिजे होते. लेखन करताना अकारण बोलीभाषा वापरू नये हा मराठी शुद्धलेखनाचा १३वा नियम आहे. अनुस्वार द्यायचा विसरला की शब्दांचे चुकीचे उच्चार होतात. उदा० वर आलेले अस, होत आणि असच हे शब्द. यांचे उच्चार आपल्याला नको असतानाही, अनुक्रमे अस्, होत् आणि असच्य् असे होतात. हेच शब्द जर असे, होते व असेच असे लिहिले असते, तर शब्दोच्चार चुकीचे झाले नसते. मराठीव्यतिरिक्त अन्य कोणतीही भाषा अशी सररास बोलीरूपात लिहिली जात असेल, असे मला वाटत नाही.
हिंदीत प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यये मागील शब्दाला जोडत नाहीत, पण मराठीत जोडतात. हे लक्षात न आल्याने प्रतिसादात वापरल्याशिवाय, समजल्यामुळे, मनोगतनेसुद्धा आणि मराठीमध्ये असले काही शब्द प्रत्यय-अव्यय तोडून चुकीचे लिहिले गेले आहेत. हा हिंदीच्या अतिपरिचयाचाच परिणाम आहे.
इंग्रजीमध्ये आणि हल्लीच्या हिंदीमध्ये, संयुक्त वाक्यात आधी मुख्य वाक्यांश(मेन क्लॉज़) आणि नंतर दुय्यम वाक्यांश(सबॉर्डिनेट क्लॉज़) येतो. मराठीत याच्या उलट. त्यामुळे वरील प्रतिसादातील 'तेव्हा लक्षात आलं की,' 'तेव्हा अजून एक मुद्दा लक्षात आला की' हे वाक्यांश 'असे तेव्हा लक्षात आले' आणि 'हा मुद्दाही तेव्हा लक्षात आला' या रूपात वाक्यांच्या शेवटी आले असते, तर ती वाक्ये जास्त मराठी वाटली असती. असच वेगवेगळ्या माध्यमातून आपण जनजागृती करू शकतो. हे वाक्य इंग्रजी वाटते. ते 'वेगवेगळ्या माध्यमांतून आपण अशीच जनजागृती... ' किंवा अशा प्रकारे, आपण वेगवेगळ्या माध्यमांतून जनजागृती.. ' असे लिहिले असते तर ते मराठीच्या प्रकृतीशी सुसंगत आहे असे दिसले असते.
लिहिलेले परत वाचून पाहणे, हा ह्यातून बाहेर पडण्याचा एक उपाय आहे.