ओशो म्हणजे सगळेच भन्नाट आणि अलौकीक! सुनामी वादळ काय, आईची करूणा काय, एक से एक अफलातून ध्यान'प्रयोग' काय. फक्त 'ध्यान करा' हे सांगण्यासाठी अमेरिकेत दान न घेता  ६४००० एकराचा आश्रम(! ) स्थापणे काय. आईच्या 'मायेची' गणती करणे सोपे थोडेच असते? 

आपले खास 'इनर सर्कल' असणारा, प्राग्जन्मीची मुग्ध प्रीत जागवणारी ब्रिटीश शिष्या(! ) लाभलेला असा महात्मा विरळा, आणि स्वायत्त स्टेनगनधारी सुरक्षाव्यवस्था लागणारा आश्रमही विरळाच. थेलियम (अमेरिकेने दिलेले)  ते नायट्रस ऑक्साईड (हौसेने घेतलेले) सगळे पचवून स्वस्थ राहणारा हा भला माणूस बघून हलाहल पचवणार्या शिवशंभूची आठवण येते.

भारताची वाढती लोकसंख्या ते जागतिक अशांतता सगळ्या प्रश्नावर बसल्याजागी, तिथल्या तिथे आणि अंत:प्रेरणेने  जगभरचे तत्त्वज्ञान, चुटकुले, शेरोशायरी आणि किस्से सांगत हमखास उपयोगी पडणारे आणि रामबाण तोडगे देणारा दुसरा संत आजवर पैदा झालेला नाही.

पाखंड म्हणजे काय? तर आपल्या सवडीशास्त्रात बसत नाही, ज्याने मजा येत नाही  ते. ओशो हमखास त्यावर टीका करणार. सत्य म्हणजे काय? तर आपल्या सवडीशास्त्रात बसते ते, ज्याने मजा येते ते. ज्याची ओशो हमखास तळी उचलणार. इतके सगळे सरळ, सोपे आणि मनोरंजक असूनही फारच थोड्या धाडसी लोकांच्या ते पचनी पडले. 

'स्व' ची ओळख हीच ओशोंची ओळख, हे तेवढे निखालस सत्य आणि बाकी सगळ्या गतानुगतिक लोकांच्या धारणा. ध्यान म्हणजे रोज जाता येता सुचणारे एक से एक अफलातून प्रयोग आणि नित्योपासना, नामस्मरण, भक्ती, चिंतन, मनन, निदीध्यास  वगैरे कालापव्यय करण्याची कालबाह्य साधने  हे सगळ्यांच्या लक्षात येईल तो सुदिनच म्हणावा लागेल!