'ठरविले' विरुद्ध 'ठरवले' यातले दुसरे, केवळ बोली भाषेचे रूप आहे असे नाही. या दुसऱ्या रूपाला व्याकरणाचा आधार आहे. दामल्यांच्या व्याकरणात(सन १९११) सांगितल्याप्रमाणे धातूंचे आचरगण, उमजगण असे काही प्रकार आहेत. आचरगणातले मुख्य धातू : आचर, आठव, उत्तर, जेव, धाव, जिंक, थुंक, नेस, पांघर, शिंकर, उगव, पाठव इत्यादी आणि शिवाय लपवसारखे प्रयोजक धातू. या धातूंना प्रत्ययांपूर्वी विकल्पाने 'अ'च्या जागी 'इ' असा (आदेश)इडागम होतो. त्यामुळे आचरितो-आचरतो वगैरे दोनदोन रूपे होतात.
उमजगणातील उमज, ओक, खेळ, चढ, पाव, पोच, पोह, प्रसव, पढ, बोल, मूत, म्हण, विसर, विसंब, शीक, शीव, समज, स्मर, हग, चूक, झोंब डस, तर, बडबड, भज, मूक, लढ, लाग, वद इत्यादी धातूंची रूपे करताना 'अ'ऐवजी 'इ' हा आदेश होत नाही, असे दामले लिहितात..
मात्र, करावयाचे/करायचे, येथे/इथे ही उच्चारसौकर्यासाठी बदल होऊन झालेली रूपे असावीत.
प्रमाणभाषा(साधुभाषा) ही कधीकाळी कोणाचीतरी बोलीभाषा असणारच. पण एकदा तिला प्रमाण म्हणून मान्यता मिळाली की लेखनाकरता फक्त तीच वापरली की बहुसंख्यांना फायदेशीर ठरते. मराठीच्या एकूण ६४ बोली आहेत(त्यांतील ३८ बोलींवर संशोधन झालेले आहे). अशा वेळी प्रत्येकाना लिहिताना आपापल्या बोलीभाषेचा आग्रह धरला तर, अनवस्थाप्रसंग उद्भवेल.
हिंदीच्या, हिंदी धरून एकूण ५० मुख्य बोलीभाषा आणि १० अत्यल्पसंख्य जमातींच्या बोली आहेत. पण लिहिताना हिंदी/हिंदुस्थानी व्यतिरिक्त फक्त भोजपुरी भाषेत वाङ्मयनिर्मिती होते. हिंदीशिवाय कोणत्याही अन्य बोलीत सरकारी पत्रके निघाली आहेत वा चित्रवाणीवर चलपट्ट्या दिसत आहेत्त असे आढळून येत नाही. केवळ मराठी दूरचित्रवाणीवर निव्वळ बोलीरूपात केलेले लेखन प्रत्यही दिसते.