ह्या अगतिकतेमागे मुख्य कारण  हे प्रामुख्याने 'इंग्रजीमधून व्यवहार केल्याने (संभाषण, लेखन इ.) आर्थिक दर्जा सुधारण्याचे प्रमाण वाढते' हा समज अथवा गैरसमज  आहे. इथे सक्तीने   अथवा आग्रहाने काही होईल असे वाटत नाही. मराठी माणसामधला स्वभाषा, स्वसंस्कृती या बाबतचा न्यूनगंड हा त्याच्या (महानगरांमधील अन्य भाषकांच्या तुलनेने)आर्थिक दुरवस्थेतून आलेला आहे. आणि मुंबई, पुणे, नागपूर इथेच व त्यांच्या आसपास हा न्यूनगंड जाणवतो, इतरत्र नाही. सध्या देशात सर्वत्रच लोकांचा ओढा महानगरांकडे आहे. त्यामुळे महानगरे बहुभाषक बनत आहेत. अश्या मिश्र वस्तीत  कोणी कोणाला जवळून ओळखत नसताना हाती पैसा असेल तर प्रथमदर्शनी थोडीफार प्रतिष्ठा मिळवणे सोपे जाते. बहुसंख्य मराठी माणसे जर धनवान होतील तर बाजारात त्यांची पत वाढेल आणि त्यांच्याशी व्यवहार करताना अन्य लोक आपोआपच मराठीतून तो करू लागतील.आज तृतीय-चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी देखील(यात घरकाम करणाऱ्या सुद्धा आल्या. ) आपल्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरतात त्यामागचे इंगीत हेच आहे.शिवाय मराठीच्या उच्चारलेखनादी वापरावरून वापरकर्त्याची आर्थिक व इतरही उच्चनीचता ठरवता येणे शक्य आहे. ती शक्यता इंग्रजी भाषा वापरताना थोडीफार कमी होते. अर्थात अभिजात इंग्रजी वेगळे उठून दिसतेच. पण इंग्रजीमध्ये बोलताना वगैरे बहुतेकांच्या समान चुका होत असल्याने ते बहुतेक जण एकाच समान पायरीवर येतात. मनातली असुरक्षितता व न्यूनगंड लपविण्यासाठीदेखील इंग्रजीचा वापर केला जात असणे शक्य आहे.

बाकी क्लिष्ट मराठीतले सरकारी अर्जादी कागद भरण्यापेक्षा ते इंग्रजीतून भरणे मराठी सुशिक्षितांना सोपे वाटत असावे.