मुळातच संस्कृत आहे. मराठीत त्या शब्दाचा वापर करताना मन, अंतःकरण, अभिप्राय, कल्पना, अंतःकरणाची स्थिती, मनोवृत्ती, निष्ठा, भक्ती, अर्थ, आशय, हेतू, धर्म, गुण, चेष्टा, हावभाव, जन्म, अस्तित्व, दर, भाऊ, माया, कपट, मिथ्या, ज्योतिषातील बारा विषय आदी अर्थाने वापरला जात असल्याचे (शब्दकोशावरून) दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे नवरसात्मक साहित्याचा विचार करतो तेव्हा शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्बुत व शांत आदी जे नऊ रस ते आस्वादाचे वैविध्य दाखवितात. या भावांच्या परिणामकारक निर्मितीसाठी गीत्तांना वेगळ्या चाली, वेगळी वाद्ये, वेगळे गायक, वेगळे प्रसंगआणिवेगळी व्यासपीठे असू शकतात पण या साऱ्यांचीच आवश्यकता असते असे नाही. तर, गीत कोणतेही असो, त्यातून कोणता तरी भाव व्यक्त होत असतोच असे म्हणता येते आणि म्हणूनच भावगीत हा वेगळा प्रकार मानण्याची आवश्यकता वाटत नाही.
इतर गीतांप्रमाणेच ‘गझल’ हेही गीतच असते. ‘मराठी गझल’ असे म्हणताना ‘मराठीने केला कानडी भ्रतार’ किंवा ‘ब्राम्हणीने केला यावनी भ्रतार’ असे कांहीतरी वाटते. गझल हीही शास्त्रशुद्ध रचना असते. त्या रचनातही वृत्ते, छंद यांचा विचार करतात. त्यांना मराठी नांवे दिलेली आहेत. या प्रकारच्या गीतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून मनातला सल व्यक्त होत असतो. तेव्हा मराठीतील अशा रचनांना ‘सलकाव्य’ म्हणता येईल. एकंदरीत पाहाता, भावगीताची तुलना फक्त गझलेशी होऊ शकते, गवळणीशी नाही हे म्हणणे पटत नाही.