भाव या शब्दाचा संस्कृतमध्ये किंवा अन्य भाषेत काय अर्थ आहे याचा मराठी भावगीतांशी काहीही संबंध नाही. भावगीत हा कोणता समास आहे त्यातील प्रत्येक पदाचे कायकाय अर्थ होतात हे आपण कितीही समजावून घेतले तरी त्याचे मराठी भावगीत या संकल्पनेशी अजिबात देणेघेणे नाही. भावगीत हा मराठीतला एक तांत्रिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ, ज्याने भावगीते ऐकली आहेत त्यालाच भावतो. भावगीत या शब्दाचा अर्थ लावणे म्हणजे शास्त्रीय गायनात ख्याल म्हणजे ध्यान, अंदाज, अटकळ, विचार, मत, आदर, खेळ, थट्टा, विनोद इत्यादी, आणि चीज म्हणजे वस्तू, दागिना, मौल्यवान गोष्ट, महत्त्वाचा जिन्नस, माल, सुंदर स्त्री आणि पनीर असे म्हणण्यासारखे आहे.
एका विशिष्ट कालखंडात मराठी भावगीतांना बहर आला होता, आणि आता गेल्या काही वर्षात एकही भावगीत जन्माला येऊ नये याचा अर्थ ज्यानेज्याने ओळखावा. नुसती भावगीतेच नाहीत तर आता, गवळणी, भारुडे, फटके, नाट्यगीते, श्लोक, आरत्या, सुभाषिते, पोवाडे इत्यादी इत्यादी अनेक काव्यप्रकारांची निर्मिती थांबली आहे.
ता. क. : वर पुल्लिंगी वापरलेला जिन्नस हा शब्द फारसी जिन्स किंवा जिनिस या स्त्रीलिंगी शब्दावरून मराठीत आला आहे. त्यामुळे काही जण मराठीतही तो शब्द स्त्रीलिंगी आहे असे समजतात.