भावगीताची तुलना फार तर गझल या काव्यप्रकाराशी करता येईल असे मी वर म्हटले होते. याचा अर्थ असा नाही की, गझलेची वृत्ते, त्यातले काफिये, रदीफ, अलामत भावगीतासारखी असते. भावगीतात तर गझलेत असते तसे रूढ गणमात्रावृत्त, बहुधा नसते. असतात ते फक्त अर्थपूर्ण मोजके शब्द, भाव, चाल आणि श्राव्यता. भावगीताचे विषय आणि गझलेची जमीन यांच्यात तुलना करता येण्यासारखी आहे, त्यांच्या व्याकरणाची नाही. काहीही असो, भावगीताचे साम्य गवळिणीशी नाही हे नक्की.
मराठी गझल काही अगदी अर्वाचीन नाही. मोरोपंतांनी गझला लिहिल्या आहेत. त्यांत वापरलेल्या वृत्ताला ते गज्जल म्हणत.