वाचनाची आवड असलेले लोक असतील तोपर्यंत कादंबरीला आणि इतर साहित्याला सुद्धा वाचकवर्ग राहीलच. तो कधीच कमी होणार नाही.

उलट मी म्हणेन की आज वाचनाची आवड वाढली आहे. टायपींग आणि छपाई संदर्भातल्या अत्याधुनिक तंत्रामुळे कादंबऱ्यांची, पुस्तकांची छपाई आकर्षक झालेली आहे.

सिनेमा, सिरियल जरी लोकप्रिय असले आणि त्यात प्रत्यक्ष दिसत असले तरी शेवटी ती कथा ही ठरावीक वलय असलेल्या किंवा ठरावीक साचा, प्रतिमा असलेल्या कलाकारांनी साकारली असते. ते कलाकार कथालेखकाच्या मनातल्या प्रतिमेला शंभर टक्के न्याय कधीच देऊ शकत नाहीत.

आणि स्थळ, प्रसंग, व्यक्ती यांचे वर्णन याबाबत म्हणायचे झाले तर, कादंबरीकाराचे शब्दभांडार एवढे भरलेले असावे आणि वर्णनक्षमता एवढी प्रगल्भ आणि जादुभरी असावी की प्रत्यक्ष चित्रपटापेक्षाही कादंबरी वाचतांना वाचकाच्या मनात स्थळ, प्रसंग, व्यक्ती चे चित्रण जीवंतपणे अधिक चांगले उभे राहायला हवे.

भारतात कदाचीत वाचनाची आवड कमी झाल्याचे थोडेफार खरे आहे असे मानले तरी इतर देशांत वाचनाची आवड आजही टीकून आहे. लंडन मध्ये मी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे.

- निमिष न. सोनार, पुणे (मनोगतवर : क्षणाचा सोबती)