मराठी भाषा पूर्णपणे नष्ट झाली तर नेमके संकट काय येईल आणि कुणावर येईल?
समजा आजपासून तीनशे वर्षांनी जगात मराठी बोलणारा एकही माणूस अस्तित्वात नसला तर नेमका काय प्रॉब्लेम होणार आहे? कुणासाठी ते संकट असणार आहे?
भाषेवर स्वतःच्या वैयक्तीक आयूष्यापेक्षा जास्त प्रेम का करायचे? मला समजा मराठी बोलणारा म्हणून मागे पडावे लागणार असेल तर ते मी मान्य का करावे? भाषेचा अभिमान म्हणजे नेमके काय? कामे इतर भाषेत बोलून होत असतील आणि मराठी बोलून एकही काम होतच नसेल तर मराठी का बोलावे? फक्त आपण जन्माने मराठी म्हणून आपल्याला मराठीचा अभिमान असायला हवा अशी अपेक्षा कशासाठी? एखाद्या जन्माने मराठी असलेल्या मुलाला जन्मापासून फक्त इंग्लीशच शिकवले तर त्याच्या इंग्लीशबद्दलच्या भावना 'आपल्या मराठीबद्दलच्य भावनांसारख्याच' असणार नाहीत का व ते योग्यच नसेल का? उद्या येथे हुकूमशाही आली आणि मराठी बोलणाऱ्यांवर आरोपपत्रे दाखल होऊ लागली तर अभिमान काय कामाचा?
'आपणच मराठीचा खून करत आहोत' हे विधान पटत नाही. मराठी बोलून उदरनिर्वाह होणार नाही असे अनेक व्यवसाय आहेत. मग मराठीला आपला खून करू द्यायचा का?
हल्लीच्या मुलांना श्रावणात श्रावणमासी वगैरे अजिबात नको असते आणि तरीही ती मुले आनंदात जगतात. मला स्वतःला 'कणा' या कवितेचा आयुष्यात काहीही उपयोग झालेला नाही. हल्ली कोणतीही आई मुलांना निंबोणीच्या झाडामगे चंद्र झोपल्याचा हवाला देऊन झोपवत असेल असे वाटत नाही.
हे मराठी मराठी काय प्रकरण आहे काही समजेनासे झाले आहे. ज्यांना बोलयचे आहे, बोलता येत आहे, ते आपोआप बोलतील. अभिमान गीताचे पुढे काय झाले काही समजलेच नाही. कुठे ऐकूही येत नाही ते गीत! इंग्रजी मिडियममधल्या मुलांना कधी ते गीत पाठही करायला लावले नाही कुणी!
भाषा ही मानवाच्या संभाषण व विकास यासाठी असायला हवी. मानव भाषेसाठी असण्याचे कारण काय?
-'बेफिकीर'!