भाषा कधीही त्याच स्वरूपात टिकत नाही. ती काळानुसार बदलते. अलीकडे संपर्कक्रांतीमुळे ह्या बदलाचे प्रमाण वाढले आहे. मराठी टिकली पाहिजे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नक्की काय अभिप्रेत असते? 'मराठी' हे नाव टिकून राहाणे? आजपासून चार-पाच दशकांनंतरची मराठी ही हिंदी, गुजराती आणि इंग्रजीची शब्दसंपत्ती,वाक्यरचना,त्या त्या संस्कृतीतल्या संकल्पना तसेच सध्याच्या मराठी बोलीभाषांचे शब्द पोटात घेऊन सुखाने नांदत असेल तर काय बिघडेल किंवा कुणाची हरकत असण्याचे काय कारण आहे ? फार्सी, ग्रीक ह्या भाषांचे फक्त नाव कायम आहे. बाकी त्या भाषा आमूलाग्र बदललेल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्या भाषा बोलणाऱ्यांचा धर्म, संस्कृती सारेच बदललेले आहे.भाषेमुळे सांस्कृतिक सलगता अथवा ऐक्य निर्माण होते हे थोड्याफार(च) किंवा फारच थोड्या प्रमाणात खरे आहे.

मराठी माणसे संपन्न आणि समर्थ झाली की त्यांच्या भाषेला (ती सध्याची किंवा कुठल्याही स्वरूपातली असो) महत्त्व येणार आणि बाजारात तिची पत वाढणारच. प्रश्न भाषेचा नाही, लोकांच्या सबलीकरणाचा आहे.