रोहिणीताई,

काकडीची मी नाही खाल्ली कधी पण वांग्यांमध्ये काळी शार लांब वांगी असतील तर भजी व कापट्या मस्त लागतात..... स्ऽऽऽ पाणी टपकतयं ! पालेभाज्यांची आवडीनुसार करतात- आमच्याकडे भुसावळला मायाळू नावाचा वेल आहे त्याच्या पानांची पण मस्त लागतात..... पालक सारखीच कुठलीही पालेभाजी घेतली तरी छान लागतील असा अंदाज आहे.....   सागरी मेथी खरोखर खुप छोट्या छोट्या पानांची असते त्यांच्या भज्यांना गुजरातेत (माझ्या सासूरवाडीकडे) 'मेथी ना गोटा' म्हणतात. मागे प्रभाकरनी ठेपल्याची पाककृती दिली होती - ठेपले बनवतांना ह्या मेथीचा वापर करतात.

माझी आई फ्लॉवरची भजी अशी बनवतेः

फ्लॉवरच्या भजांचे पिठ बनवतांना आधी मिक्सर मधून- हिरवी मीरची, लसूण व  ओवा (पाणी न घालता) थोडे फिरवून मग पिठात मिक्स करावे. ह्यांत हळद अजिबात टाकू नये.  फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे/तुकडे आधी तेलात तळून घ्यावे - फ्लॉवर जरा कोवळाच निवडावा- मग हे तळलेले तुकडे एका कागदावर पसरून ठेवावे- मग थंड झाले की पिठात बुडवून त्याची भजी - अर्धवट तळलेली - काढावीत - मग ती बाहेर काढून एका वाटीच्या बुडाने दाबावी - नंतर पुन्हा चांगली लाल कुरकुरीत होई पर्यंत तळावी.  

मृदूला ताई, कोनफळ हे सुरणा सारखे असते (कॉर्मरुट) पण त्याची त्वचा (स्किन) खरवडल्यावर पर्पल किंवा डार्क मजेंडा (जो रंग आता तुमच्या पडद्यावर दिसतो आहे ना, आम्ही ह्या रंगालाच कोनफळी रंग म्हणतो) किंवा बिटच्या  रंगा सारखे दिसते व जमीनीच्या खाली सुरणासारखे उगवते. मला इंग्रजीतला नेमका शब्द माहित नाही पण उद्या खोदून काढेन ! ह्या कोनफळाच्या चिप्स पण मस्त लागतात - (जश्या आपण बटाट्याच्या करतो तश्या). आम्ही हे उपासालाही खातो. कोनफळ मिक्स भाजीत पण मस्त लागते. शेंगा वांग बटाटा (किंवा कधी कोनफळ वा दोन्ही) अशी माझ्या आजोळची वैशीष्ठ असलेली भाजी पण छान लागते.

हे सगळे लिहितो आहे म्हणजे मला काही बनवता येते असे नका समजू .... मी फक्त खायच्या कामाचा आहे (आमच्या तिर्थरुपांचा आवडता शेरा).