ज्यांनी तो कार्यक्रम नीट ऐकला असेल त्यांना नक्कीच मेधा पाटकर यांनी दिलेले स्पष्टीकरण आठवत असेल. त्यांनी फाशीच्या क्रुरतेबद्दल मत मांडले नसून फाशी किंवा तत्सम शिक्षेच्याच विरोधात मत मांडले होते.
सुसंस्कृत म्हणून स्वत:ला म्हणवून घेताना, केवळ आमची माणसे मारली म्हणून ती मारणाऱ्या माणसांना मारणे हे किती न्यायसंगत आहे असा त्यांनी सवाल केला होता. माणसे मारणे हे जर मुळातच चुकीचे समजून त्या बद्दल आपल्याला चीड येत असेल तर तेच कृत्य आपण केवळ राजकीय यंत्रणेच्या आड दडून करत असू तर आपण आरश्यात स्वत:ला कसे बघू धजावतो? माणसे सगळीच मुलत: चांगली वा वाईट म्हणून जन्माला येतात का? त्यांच्या ते तसे होण्याला जी काही कारणे असतात त्यांवर त्यांचा पूर्ण अंकुश असतो का? या सगळ्याचा आपण आपल्यासाठी जेवढ्या सहिष्णूपणे विचार करू शकतो तेवढाच विचार देश, धर्म , जातीच्या पलीकडे जाऊन 'आपण' जे ' हे विश्वची माझे घर' म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांची पताका अभिमानाने मिरवितो त्यांनी करायला नको का? कसे आहे मित्र हो, आपण म्हणजे 'नागरी माणूस' हा ढोंगी आहे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. स्वत:च्या गरजेप्रमाणे आपण आपले नियम संकेत मुरडतो. जिची मुले मारली गेली ती आई त्या खुन्याचा तळतळाट करत त्याच्या चिंधड्या कराव्या अशी मागणी करते, तेंव्हाच त्याची आईही रडतभेकत आर्जवे करीत असते 'माझा पोर गुणी होता हो पण कधी कसा कोणी या व्यसनाला फितवला कळले नाही.' कुठली 'आई' सच्ची हे आपण कसे ठरवावे? खरचं आपण दुसऱ्याचे संगोपन/ शिक्षण कसे झाले याची चिरफाड करू शकतो का? व्यसनी माणसाला जसे आज आपण वेगळ्या दृष्टीने पाहू लागलेलो आहोत की, व्यसन त्याला भाग पाडते पुन्हा पुन्हा त्या मार्गावर जाण्यासाठी. आज जसे आपण आरोप करू शकत नाही की 'त्या व्यसनी माणसाला स्वतंत्रपणे विचार करता येत नव्हता का? सगळे दिसत असूनही का आपली धूळधाण करून घेतली' कारण त्याची कारणे मेंदूच्या पातळीवर घडतात. त्याचप्रमाणे ही 'देशद्रोही' माणसे कुठल्या प्रकारच्या व्यसनांची शिकार आहेत त्याचा समंजसपणे विचार करणे हे सुसंस्कृत समाजातील समंजस व्यक्तीने करायला नको का?
का, आपणही एका धर्मविद्वेश नावाच्या व्यसनाचे बळी ठरत आहोत?
या देशात अनेक गरीबांच्या तोंडी अर्धी भाकरीही मिळत नाही त्याला सरळ सरळ कारणीभूत असणारे, आपल्या तुंबड्या यथेच्छ भरणारे हे अधिकारी/ नोकरशहा क्रूर ठरत नाहीत? का ते आमच्या देशाचे, धर्माचे आहेत म्हणून? म्हणून तर मला वाटते की आपण ढोंगी असतो. मानायचे की नाही हे स्वत:च्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.
मेधाताईनी आम्हांला पटेल त्याच विषयावर मते मांडावीत, ही त्यांच्यावर जबरदस्ती नाही का? त्यांनी कुठल्या विषयावर मते मांडावीत हे आम्ही ठरविणार, आणी आम्ही कोणत्या विषयावर मते मांडायची हे कोण ठरविणार? मेधाताई, नका तुम्ही या देशाच्या जनतेचा बुद्धीभेद करू! कारण अजून आम्ही वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडलेलो नाहीत.