नीट कसली भाषा नव्हती, तेंव्हाही खाणाखुणा करून माणूस आपला कार्यभाग साधत होताच. असे म्हणतात की, या आधुनिक भाषांनी संकेतांच्या, चिन्हांच्या, चित्रांच्या सक्षम भाषेला मारून टाकले. असे असले तरीही, आज स्वत:चे वेगळेपण (आयडेंटीटी) जपण्याच्या प्रस्थापित करण्याच्या जमान्यात तुमच्या मातृभाषेचे मोल महत्वाचेच ठरतेच. आजचे एक संशोधन असेही सांगते की, मातृभाषा ही तुमच्या जीन्सपातळी पर्यंतही पोहचली आहे. त्यामुळे तुमची आकलन शक्ती, विचार करण्याची ताकद या सगळ्यावर मातृभाषा प्रभाव गाजवते. म्हणूनच मातृभाषेतून शिक्षण घेणे हे योग्य ठरते. आम्हांला दुसऱ्याच्या ओंजळीने पिण्याची सवय पडली आहे. परदेशातून महत्व ठसविले की आम्हांला ते पटते म्हणून सांगतो. आज परकीय भाषा शिकण्याची ओढ लागली आहे. यात फ्रेंच, जर्मन, जपानी सारख्या भाषा आहेतच. का या शिकाव्या लागतात? कारण त्यांना व्यापारी मूल्य आहे. हे त्यांना का आले कारण, त्यांच्या भाषिकांनी त्यांची सेवा केली म्हणून. पर्यटन विकासासाठी सोयीची म्हणून युरोपीयन देशांनी इंग्रजी स्वीकारली आहे, पण इतर सर्व व्यवहार आपल्याच भाषेतून करण्यावर त्यांचा कटाक्ष असतो हा माझा तेथील थोड्या कालावधीतील अनुभव आहे. जगणे सुसह्यच होईल म्हणूनही आणी मातृभाषा म्हणून ती आमच्या रक्तात भिनलेली आहे म्हणून तिचा आदर राखण्यासाठी मनापासून तिचा वापर करायलाच हवा. भाषेची गरजच काय? असे प्रश्न मनात असूनही मी मराठी संवर्धनाचे सर्व प्रकार प्रामाणिकपणे पूर्वीपासूनच आचरणात आणले आहेत. मी मराठी आहे यातला अहंकार/ अभिमान/ गर्व राहू द्या पण 'मराठी' आहे ते का नाकारू?