(वरील अभंगांमधील प्रसंगांचे वर्णन करणारे नामदेवांचे मराठीतील अभंग कोणास माहित असल्यास कृपया प्रतिसादात द्यावेत ही विनंती. )

          -संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन असल्याचे मानले जाते. तथापि, असे मानले जाते की संत नामदेव यांचा जन्म शके ११९२ (इ. स. १२७०) चा तर संत ज्ञानेश्वरांचा जन्म शके ११९७ (इ. स. १२७५) चा. (संत जनाबाई यांनी ज्ञानेश्वरांचा जन्म शके ११९३ चा असल्याचे सांगितले आहे. ) म्हणजे संत नामदेवांपेक्षा संत ज्ञानेश्वर एक ते पांच वर्षांनी लहान होते. तत्पूर्वी दोघांनी भारतातील निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांची यात्रा केली होती. त्यावेळी असलेल्या साधनांचा विचार करता ही तीर्थयात्रेसाठी दोन-तीन वर्षे तरी लागली असतील. संत नामदेवांच्या चरित्रात असा उल्लेख येतो की ते वयाच्या पंचेचाळिशीनंतर पंजाबात गेले. पंजाबातील घुमान या गांवी संत नामदेवांचे स्मारकमंदीर असून ते ‘गुरुद्वारा बाबा नामदेवजी’ या नांवाने प्रसिद्ध आहे. ते जिथे राहात होते त्याच जागी त्यांचे पट्टशिष्य बहोरदास यांनी ते मंदीर उभारले असे तेथील मंडळी मानतात. तेथे माघ वद्य द्वितियेस मोठी यात्रा भरते. संत नामदेव यांच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य असे दिसते की त्यांच्यापाशी लोकसंग्रहाची विलक्षण हातोटी होती. त्यामुळे फार मोठा शिष्यवर्ग पंजाबात त्यांच्याकडे आकृष्ट झालेला आहे.

१८-२० वर्षे संत नामदेव-बाबा नामदेविए-पंजाबात राहिले. हा कालावधी तसा मोठा आहे. त्यामुळे त्यांना गुरुमुखी भाषा आत्मसात करता येणे शक्य झाले असावे. पण, त्या भाषेतल्या रचना करण्यासाठी मात्र कांही वर्षे गेली असणे स्वाभाविक दिसते. दुसरे म्हणजे संत नामदेवांच्या या रचना शुद्ध गुरुमुखीतील नसून हिंदी-मराठी-गुरुमुखी अशा संमिश्रित भाषेतील असल्याचे दिसते. शीख संप्रदायाच्या गुरुग्रंथात संत नामदेवांची ६१ पदे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. पंजाबातील वास्तव्यात ईश्वराची प्रचिती देणाऱ्या चमत्कारिक प्रसंगांचा जो उल्लेख त्यांच्या पदातून येतो, तसा त्यांच्या मराठी अभंगातून येत नाही. पण, सकल संत गाथेत संत नामदेवांचे शिष्य, संत चोखामेळा यांच्या एका अभंगात मात्र या चमत्काराचा उल्लेख येतो. तो अभंग असा -

नामदेवा हातीं स्वयें दूध पेला । अपमान केला बादशहाचा ॥
करिता कीर्तन देऊळ फिरविले । प्रत्यक्ष दाविलें अवंढ्यासी ॥
अकबरे गाय वत्स मारियेलें । कीर्तनीं उठविलें नामदेवें ॥
परिसा भागवतें परिस पैं दिधला । राजाईनें ठेविला आपणापासीं ॥
तयालागीं वाळुवंटीं परिस केले । अज्ञान निरसिलें परिसीयाचें ॥
चोखा म्हणे ऐसी कृपेची माउली । आम्हां ती वोळली जन्मोजन्मीं ॥

     संत नामदेवांची महती त्यांचे शिष्य चोखामेळा यांच्या अभंगातून जागोजागी पाहावयास मिळते. संत ज्ञानेश्वरांनाही संत नामदेवांबद्दल अपार आदर होता. संत नामदेवांचे ‘तीर्थावळी’ चे जे अभंग आहेत, त्यात उल्लेख येतो की अध्यात्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी नामदेवांना विनंती केली होती व ती विनम्रभावे नामदेवांनी पूर्ण केली. त्या तीर्थयात्रेदरम्यान ज्ञानेश्वरांच्या साक्षीने द्वारकेत घडलेला एक चमत्कारही नामदेवांनी वर्णन केला आहे ज्यात नामदेवांच्या आर्त विनवणीमुळे विठ्ठलाने विहिरीत खोल गेलेले पाणी उचंबळून वर येऊन वाहू लागल्याचे सांगितलेले आहे.

‘ज्ञानदेवें रचिला पाया । कळस झळके वरी तुकयाचा ॥’ जवळजवळ पांचशे वर्षांच्या काळात होऊन गेलेल्या संतांच्या चरित्रातून दिसते की त्यांच्या आराध्य मूर्तीतील देव साकार होऊन अनेक आश्चर्यजनक घटना घडवितो ज्या आज अविश्वसनीय वाटतात. असे प्रकार इतर धर्मीय संतांच्या आयुष्यातही घडलेले आहेतच. मनाच्या विशिष्ट अवस्थेतून प्राप्त होणाऱ्या अशा शक्तीने पारंपारिकरित्या माणसाला जिज्ञासू बनविलेले आहे.

(संदर्भ : श्री नामदेव गाथा, महाराष्ट्र शासकीय ग्रंथ, सकल संत गाथा)