मराठी / मातृभाषा / एखादी भाषा यावर असलेले आपले (आपले म्हणजे एखाद्याचे) प्रेम म्हणजे नक्की काय असते असा विचार केला तेव्हा असे वाटले की भाषेवरचे प्रेम यात त्या माणसाला खालीलपैकी एक अभिप्रेत असावे. 

१. ही भाषा 'आपली' (कोणत्याही कारणास्तव - म्हणजे मातृभाषा आहे म्हणून किंवा सध्या राहात असलेल्या प्रदेशाची भाषा आहे म्हणून) वाटणे. 

(यात असे म्हणायचे आहे की मद्रासमधील मराठी माणसाला मराठीपेक्षा इंग्लीश ही भाषा 'आपली' वाटू शकेल.) ('म्हणून तर आम्ही म्हणतोय की मद्राश्यांप्रमाणे तुम्हीही मराठीतच बोला' हे वरील काहींचे मत पुढील मुद्यात विचारात घेत आहे.)

२. मी जी भाषा मातृभाषा म्हणून शिकलो व ज्यात मी विचार करतो / घरात व जमेल तेथे बोलतो, ती भाषा 'माझ्या संवादाचे माध्यम' यापेक्षा मला काहीतरी अधिक वाटते व हे माझे भाषेवरील प्रेम आहे. तर ही अधिक का वाटते, कारण त्यातील साहित्य मी वाचलेले असते, मी त्याच भाषेत विचार करत असतो, मी शक्य तेथे ही भाषा बोलतो, परकीय प्रदेशात कुणी ही भाषा बोलणारा आढळला की मला तो अधिक 'आपलासा' वाटतो. हे जर पटत असेल तर हे पटायला हरकत नसावी की एक विशिष्ट भाषा हा घटक प्रामुख्याने माणसाचा भौगोलिक प्रदेश जास्तकरून सुचवतो. म्हणजे मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन असणार असे काहीसे! यातून असे जाणवावे कीः

अ - मला सर्वाधिक सोयीची असलेली अशी ही भाषा आहे म्हणून ती टिकली पाहिजे

ब - ही भाषा बोलणारे मातीच्या नात्याने मला इतरांपेक्षा अधिक जवळचे असतात असे मला वाटते. 

आता हे जर पटत असेल तरः

१. आपल्या सोयीने जग चालणार नाही. जगातील सर्वाधिक कार्यक्षम व सामर्थ्यशाली मानवसमुह स्वतःची भाषा प्रसारीत करणार. ती व्यवहाराची व (त्यामुळेही) शिक्षणाची भाषा बनणार, जशी आज इंग्लीश आहे. अरबस्तान, इराण व अफ्गाणिस्तान येथील लोकांनी आपल्यावर हल्ले केले नसते तर उर्दू या भाषेचा जन्म झाला असता का असा प्रश्न पडतो. ते 'त्याकाळात' आपल्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होते. त्यामुळे त्यांची भाषा आली. उर्दू भाषेतच हिंदुस्तानातील (शब्द मुद्दाम वापरलेला आहे) बहुतांशी कलाकृती सुरुवातीला निर्माण झाल्या हे नाकारता येणार नाही. मराठी माणसे संख्येने इंग्लीश व अरबी व तत्सम भाषा बोलणाऱ्यांपेक्षा संख्येने कमी आहेत. तसेच आपण इतर प्रदेशात जाऊन सत्ता स्थापन केलेली नाही. (निदान इसविसन १२०० पासून तरी नसावी. ) इतर भाषिक, जसे गुजराथी वगैरे, हेही जरी इंग्लीश व अरबी लोकांपेक्षा खूप कमी असले तरीही ते खूपच अधिक कर्तृत्ववान असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. तसेच सरदारजी हुषार व व्यावसायिक असतात. दाक्षिणात्यांमध्ये सेवाभाव व कष्ट करण्याची प्रवृत्ती अधिक असते. बंगाली लोक अनेक गोष्टीत तरबेज असतात. (आता स्टॅटिस्टिकली या विधानांचा विरोध करण्यासाठी मराठी नावे जरूर देता येतील, पण वरील विधाने सर्वश्रुत व सर्वांनी अनुभवलेल्या बाबींवर अवलंबून असलेली आहेत). असे असताना मराठी माणसाला आपली भाषा सामर्थ्यशाली बनवावी लागेल. आपण आपली स्वतःची राजधानी ( म्हणजे महाराष्ट्राची) हातून घालवलेली आहेच. तेथे इतर भाषिकांचा जबरदस्त पगडा आहेच. मला स्वतःला पुण्यात कधीही भाषेचा प्रश्न येत नाही व मराठीत सर्व व्यवहार करता येतात. मात्र नागपूर, औरंगाबाद, जालना, जळगाव येथे अनेक टक्के महाराष्ट्रीय लोक हिंदी बोलत असतात. आपल्या सोयीने जग चालणार नाही हे पुन्हा नमुद करतो. ते तसे चालवाए लागेल व त्यासाठी मुळात कर्तृत्व दाखवावे लागेल व तेही अनेक पिढ्यांचे! 

२. मराठी बोलणारा माणूस आपल्याला अधिक जवळचा वाटतो ते केवळ संवाद साधण्यासाठी वाटत असतो हे लक्षात घ्यायला हवे. उदाहरणार्थः उत्तर प्रदेशात समजा आपल्याला रस्त्यावर अपघात झाला. तेथे दोन माणसे जमली. एक हिंदी भाषिक व एक मराठी भाषिक आपण मराठी माणसाला अधिक सहजपणे 'काय मदत हवी' हे सांगू शकू इतकेच! याचा अर्थ दुर्दैवाने आपण असाही समजत असतो की तो माणूस केवळ मराठी आहे म्हणून खूप मदत वगैरे करेल. आता मी हे स्वानुभवाने (मुंबई पुणे एक्स्प्रेसवर मला झालेल्या अपघातात एका मराठी माणसाने मदत नाकारली, केलीही एका मराठी माणसानेच, पण नाकारणाराही एक मराठीच होता व मदत नाकारण्याचे त्याचे कारण केवळ 'वेळ कमी आहे' इतकेच होते. ) माहीत आहे. आपल्याला मराठी भाषिक जवळचा वाटतो तो केवळ प्रादेशिकतेमुळे हे लक्षात घ्यायला हवे. माणसे सगळीच चांगली व सगळीच वाईट असू शकतात. इतर भाषिक आपली भाषा (कदाचित हिदीला जवळची म्हणून) पटकन शिकतात, आपण भाव खात बसतो. 

एकंदर माझे मतः

आपण भाषेला अवास्तव महत्त्व देत आहोत. मराठी आपोआप काही शतके टिकेल, बदलत राहील व एका कोणत्यातरी शतकात इतर भाषा संपुष्टात आल्या तशी कदाचित संपुष्टातही येईल. तुम्ही आम्ही मराठीचा आग्रह काही २५ तेर ३० % ठिकाणीच (महाराष्ट्रातले बोलतोय, इतर प्रदेशात तर फारच कमी) धरू शकतो. नुकतेच ऑक्स्फर्ड या डिक्शनरीने 'ओएमजी' हा शब्द (ओह माय गॉड या अर्थी ) स्वीकारला. हा परिणाम याहू चॅटिंग व इतर चॅटिंगचा! तसेच 'एल ओ एल' ही स्वीकारला तो 'लोडस ऑफ लाफ' या अर्थी! हाही परिणाम त्याचाच! आता काही दशकांनंतरची मुले ओएमजी आरामात वापरतील व तो साहित्यातील नियमीत प्रकार बनेल कारण ऑक्सफर्डने स्वीकारलेला आहे. अशाच भाषा बनत जाणार आणि संपत जाणार! 

===================================

अवांतर - नीता आबेगावकरः

१. मी भारत देशाची सीमा अजून ओलांडलेली नाही. मला गोऱ्या मडमेशी ( म्हणजे इंग्रजीशी) लग्न वगैरेही करायचे नाही. मी केवळ मराठीबाबतच बोललेलो आहे. 

२. ज्ञानेश्वर महाराज वेडे होते की नव्हते हा एक स्वतंत्र चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. मात्र 'ते म्हणतात' म्हणून आज मराठीचा आग्रह धरायचा हा मात्र मला वेडेपणा वाटतो. 

धन्यवाद! 

-'बेफिकीर'!