मेधाताईंचे नक्की म्हणणे काय आहे? फाशीची शिक्षा नसावी की मृत्युदंडाची शिक्षाच कायद्यातून काढून टाकावी?

फाशीची शिक्षा नसावी यात थोडेफार तथ्य असू शकते. त्याऐवजी इंजेक्शनद्वारे मृत्यू असे उत्तर देता येईल.

साधारण १२-१५ वर्षांपूर्वी 'चित्रलेखा' नावाच्या नियतकालिकात येरवड्याच्या तुरुंगातील 'जल्लादाची' मुलाखत वाचल्याचे आठवते. सदरहू गृहस्थ असे म्हणाले होते की कोणाला फाशी देणे हे त्यांना मानसिकदृष्ट्या फारच त्रासदायी होते. कोणाला फाशी दिल्यानंतर ३-४ दिवस हे गृहस्थ संपूर्णतः दारूच्या नशेत घालवत असत जेणे करून मानसिक त्रास कमी होईल. भारतात जल्लादांची संख्या तेव्हा झपाट्याने कमी होत होती. त्यामुळे विजेची खुर्ची किंवा इंजेक्शनद्वारे मृत्यू हे पर्याय तपासून पाहण्यास हरकत नसावी.

पण जर का मेधाताईंचे म्हणणे 'मृत्युदंडाची शिक्षाच कायद्यातून काढून टाकावी' असे असेल तर मात्र मानवी समाजाचे अवघडच आहे. कारण काही गुन्हे आणि काही गुन्हेगार हे इतके भयंकर असतात की त्या प्रकारच्या गुन्ह्यांना आणि त्या गुन्हेगारांना मृत्युदंड देणे अपरिहार्य असते. (ते गुन्हे कोणते त्याचे काथ्याकूट इथे टाळले आहे. )

मृत्युदंडाची शिक्षाच कायद्यातून काढून टाकावी ही फार निसरडी (स्लीपरी स्लोप) मागणी आहे. म्हणजे उद्या तुरुंगही नसावेत. गुन्हेगारांचे कैदेत न ठेवता त्यांचे मन वळवून (एखाद्या जादूच्या काडीने) त्यांना समाजात मुक्तपणे वावरू द्यावे इ. इ. अश्या मागण्याही पुढे येतील.

"कुलूप हे सज्जनांना सज्जन ठेवण्यासाठी असते. " जे गुन्हेगार नाहीत त्यांना शिक्षेची भीती नाही. आणि आपण एखादा गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा होऊ शकते हा 'धाक' समाजाला असणे आवश्यक आहे असे वाटते. तसेच काही गुन्हे घडू नयेत म्हणून मृत्युदंडाची शिक्षा असणे आवश्यक आहे. (ते गुन्हे कोणते त्याचे काथ्याकूट इथे टाळले आहे. )

चर्चेसाठी असे मानूया की मृत्युदंडाची शिक्षा कायद्यातून हद्दपार केली आहे. तसे केले असता जे गुन्हेगार मृत्युदंडास पात्र ठरले असते त्यांचे काय करावे? त्यांना मरेपर्यंत करदात्यांच्या खर्चाने फुकट पोसत राहावे की काय?

श्रीमद्भगवतगीतेतला भगवान कृष्णांचा उपदेश "सुयोग्य" मृत्युदंडाचे समर्थन करतो असे वाटते. भगवान रामचंद्रांनीही आपल्या कृतीतून मृत्युदंड वर्ज्य नाही हेच सांगितले आहे.