गमणे हा पूर्णपणे मराठी शब्द आहे. त्याचा अर्थ भासणे, वाटणे, पावणे, रेंगाळणे असा शब्दकोशात दिलेला आहे. 'मज गमे ऐसा जनक तो' किंवा 'आहे मनोहर परी गमते उदास' या वाक्यांतून तो स्पष्ट होतो. जुन्या मराठी साहित्यात हा शब्द वारंवार आढळतो. संस्कृत 'गमन' हून हा शब्द वेगळा आहे. मराठीच्या इतर बोलीभाषांमध्येही हा शब्द असणे शक्य आहे.
आवेली, गयेलो ही रूपे गुजरातीत पूर्ण भूतकाळाची म्हणून वापरतात. तिथे साहाय्यक क्रियापदाची गरज नसते. 'हुं आवी हती' आणि 'हुं आवेली' ह्या दोन्हींचे अर्थ साधारणतः सारखेच होतात आणि प्रमाणित गुजरातीमध्ये दोन्ही रूपे मान्यताप्राप्त आहेत. मराठीत पूर्ण भूतकाळ दाखवताना आपण 'तो गेलेला होता, ते काम संपलेले होते' अशी वाक्यरचना 'असणे' हे साहाय्यक क्रियापद वापरून करतो. बोलभाषेमध्ये (बोलीभाषा नव्हे) मात्र 'ती आलेली, ते काम संपलेलं' अशी साहाय्यक क्रियापद न वापरता केलेली वाक्यरचना क्वचित कुठे आढळते. लिखित मराठीमध्ये ती तेव्हढीशी रूढ झालेली नाही. 'मराठीभाषेवरचा गुजराती प्रभाव' हा विषय संशोधन करण्याजोगा आहे. मुंबई, ठाणे पासून ते थेट धुळे जळगाव पर्यंतचा सीमावर्ती उत्तर महाराष्ट्र गुजरातीच्या प्रभावाखाली आहे. मुम्बई-ठाण्यातले आद्य रहिवासी पाठारेप्रभू,पाचकळशी,चौकळशी,पांचाळमिस्त्री, दुबळा, कातकरी,वारली, पटेलकोळी या सर्वांच्या भाषेवरचा गुजरातीचा प्रभाव अभ्यासकाला जाणवतो.हेच गुजरातीविषयीही म्हणता येईल.गुजरातच्या दक्षिण सीमेवर मराठीचा प्रभाव जाणवणे साहजिक आहे. अगदी दोनशे वर्षे पूर्वीपर्यंत मुंबईचा इतर भारताशी संपर्क खुष्कीच्या मार्गाने गुजरातेतूनच होता. सुरत, डहाणू, वसई आणि मग जलमार्गाने सोपारा,कल्याण,चौल,माहिम वगैरे. दक्षिण कोकणाशी मुंबईचा घनिष्ठ संबंध त्यामानाने अलीकडचा म्हणजे इंग्रज आल्यानंतरचा आहे. वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या 'आग'बोटीमुळे जलवाहातूक सोपी झाली.
'माँगना' हा शब्द मुंबई द्वारे हिंदीतही गुजरातीतल्या 'पाहिजे असणे ह्या अर्थाने घुसला आहे. माँगना चा मूळ हिंदी अर्थ 'मागणी करणे (डिमांड) असा आहे. एक हिंदीभाषक 'आप को क्या चाहिए' असे विचारेल तर बंबैय्या हिंदी बोलणारा 'आप को क्या मँगता? ' असे विचारेल.