संभाजी महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन अमावास्येला असते आणि त्या दिवशी त्यांचे पुण्यस्मरण केले जाते.   संभाजीची कारकीर्द महाराष्ट्रापुरती मर्यादित होती, तर शिवाजीची संपूर्ण देशासाठी महत्त्वाची होती. त्यामुळे संभाजीचे हे स्मरण निश्चित लहान प्रमाणावर होते. नेहरूंची जयंती जशी साजरी होते तशी इंदिरा, राजीव आणि संजीव गांधी यांची होत नाही; रामजयंती होते तशी लव-कुश जयंती होत नाही.   एखादा मनुष्य मोठा होतो याचे कारण केवळ तो मोठा असतो हे नाही, तर त्याच्यामागून येणारा त्याच्यापेक्षा किंचित का होईना लहान असतो म्हणून. कागदावर काढलेल्या सरळ रेषेजवळ दुसरी लहान रेषा काढल्याशिवाय पहिली रेषा मोठी होत नाही.

आणि शिवाजीच्या फक्त दोन नसून तीन जयंत्या साजऱ्या होतात. 
पहिली वैशाख शुद्ध तृतीयेला; ही जयंतीची तिथी  शिवाजीचा जन्म १६२७ मध्ये झाला या गृहीतावर आधारलेली आहे. या तिथीला पूर्वी महाराष्ट्रातही आणि आता उर्वरित भारतात शिवजयंती साजरी होते.

दुसरी, फाल्गुन वद्य तृतीया.  शिवाजीचा जन्म या दिवशी १६३० साली झाला हे सिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ही तिथी स्वीकारली.  ऐतिहासिक काळात होऊन गेलेल्यांची जयंती तिथीप्रमाणे पाळावी हा महाराष्ट्र सरकारने निश्चित केलेला संकेत होता.

पुढे कुठेतरी माशी शिंकली आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एका सभेत शिवजयंतीची सुटी तारखेप्रमाणे दिली जाईल असे जाहीर केले. तोपर्यंत, हिंदू पंचांग, ज्यूलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर यांच्यातील फरक जाणून घेऊन इतिहासकारांनी शिवजन्माची तारीख १९-२-१६३० ही सुनिश्चित केली होती.  त्यामुळे शिवाजीची सरकारी जयंती आता १९ फेब्रुवारीला असते.

संभाजीच्या नशिबात असा तारखांचा घोटाळा नाही.

 अधिक माहितीसाठी दुवा क्र. १ उघडून वाचावे.