प्रथमत: श्रीमान टग्या यांचे काही उद्बोधक विचारांसाठी आभार!
मानवी समाजाचे रहाटगाडगे शांतपणे चालण्यासाठी, काही नियम असणारच पण ते सतत परिष्कृत करत जायला हवेत. यात मला नेहमी गोची अशी आढळते की, आपल्याला प्रत्येक नियम एक त्रिकालाबाधित सत्यासारखा वापरायची सवय असते. पण तसे असू शकत नाही. आणी मग खोलात जायची इच्छा नसल्याने आपण बऱ्याच वेळा त्या नियमाला जसाच्या तसा सर्वकाळ लादतो.
शिक्षा ही असावी की नसावी हा ही प्रश्न उपस्थित केला गेला तो याच संभ्रमातून. गुन्ह्याला शासन व्हायला हवे म्हटले तर शिक्षा हवीच, पण ती त्या व्यक्तीच्या संदर्भातसुद्धा जोखायला हवी. केवळ या परिस्थितीसाठी ही शिक्षा आहे म्हणून ती द्या ठोकून हे कितीपत योग्य होऊ शकते. गुन्हेगारसुद्धा एक व्यक्ती असतो, किमान तो गुन्हा करेपर्यंत तरी असतोच ना? प्रत्येकासाठी स्वतंत्रपणे विचार करायला आज येथे वेळ कोणाला आहे हा प्रश्न आहे? प्रत्येकाची संदर्भ चौकट तपासायला वेळ कोणाला आहे? खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक नियम /कायदा हा खूप मर्यादित असतो असे वाटते.
तरीही, चर्चाच करायची तर, या सगळ्या नियमांना / कायद्यांना माणसे घाबरतात? कसाबला फाशी दिल्याने खरोखर सगळे दहशतवादी घाबरतील किमान काही टक्के तरी नियोजित दहशतवादी हल्ले मागे घेतले जातील? दहशतवाद्यांना जाऊ द्या आपण तरी कितीवेळा रोजच्या नियमांना भीक घालतो हे आपण स्वत:लाच विचारूया, प्रामाणिकपणे! देवाला सर्व घाबरतात असे म्हटले जाते, खरं आहे का ते? देवाच्या नाकाखाली देवळातच किती भ्रष्टाचार माजलेला असतो, बाहेर तर पाहुयाच नको. त्यामुळे, कायद्याची भीती वगैरे किंवा कसाबसारख्याला यमसदनी पाठविल्याने अश्या कृत्यांना आळा बसेल अशी आशा करणे म्हणजे भाबडेपणाच ठरेल.
असे नाही की, काहीच करायचे नाही. पण, आपली मूल्ये पुन: पुन: तपासून ती बदलावयाची मनोमन तयारी ठेवली तर विचारातून मार्ग निघत जातील. तेच मार्ग जास्त 'मानवी' असू शकतील. आपण व्यक्तीला किती खोलात जाऊन सहृदयतेने अभ्यासतो त्यावर त्या 'मानवी'पणाची कसोटी असेल.