रेषा आणि रेखा ह्या दोन साधारण समानार्थी संस्कृत शब्दांपासून मराठीतला 'रेघ' हा शब्द बनला असावा. पण कोंकणातल्या वयोवृद्ध स्त्रियांना 'रेषे' हा शब्दसुद्धा वापरताना ऐकलेले आहे. गंमत म्हणजे त्या तो पुंलिंगी अनेकवचनात  वापरीत. उदा. 'रायवळ आंब्यात खूप रेषे असतात'. म्हणजे रेषा हा शब्द तमाशा, फटाका, मसाला या शब्दांप्रमाणे पुंलिंगी झाला . शब्दाचे स्वरूप कायम राहिले असले तरी लिंगबदलामुळे त्याला मराठीचा गंध (वास) लागला असे म्हणता येईल. आणि त्यामुळेच 'दार हा एरवी तद्भव आणि प्राकृत शब्दांनाच लागणारा फार्सी प्रत्यय त्याला लागणे कदाचित समर्थनीय ठरू शकेल.

जाता जाता :   तत्सम विशेष नामांमध्ये ही लिंगबदलाची प्रक्रिया वाढीला लागलेली दिसते. उदा. सविता,रश्मी,अंजली मधू इ.

आणखी जाता जाता : मराठी शुद्धलेखनाच्या प्रचलित  नियमांनुसार संस्कृत ऱ्हस्वान्त शब्द मराठीत दीर्घान्त बनून येतात. ह्या बदलामुळे त्यांना तद्भव मानावे असा काही नियम आहे का? (नियमावली वाचून बराच काळ लोटला आहे म्हणून ही विचारणा, बाकी काही नाही.)