संस्कृतमध्ये आकारान्त पुल्लिंगी शब्द अत्यंत थोडे आहेत. गोपा, विश्वपा, सोमपा, धूम्रपा, शंखध्मा, बलदा इत्यादी इत्यादी. मराठीत भरपूर. रेषा जर पुल्लिंगी तद्भव मानला तर निदान कोकणापुरते का होईना, रेषेदार हे रूप होऊ शकते. आणि पुन्हा, रेषेदार हा शब्द त्याज्य आहे असे मी म्हटलेच नव्हते, उलट रेषेदार आणि रेषाळ हे दोन्ही शब्द भिन्न अर्थच्छटेने व्यवहारात आणावे असेच माझे मत मी मांडले होते. आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाला 'दार' लावण्याचे सुख रेषेदारने दिले आहे.
>>नामांमध्ये ही लिंगबदलाची प्रक्रिया वाढीला लागलेली दिसते.<< मराठीत आकारान्त नावाचे पुरुष बहुधा नसतात. 'राजा' हा एकुलता एक अपवाद असावा. हरी किंवा विष्णूसारखे जे ईकारान्त किंवा ऊकारान्त आहेत त्यांतले अंत्याक्षर मुळात ऱ्हस्व होते. त्यामुळे ज्या संस्कृत शब्दांचे प्रथमेचे रूप आकारान्त किंवा ईकारान्त होते ते सविता, रश्मी, अंजली(मुळात अंजलि:)सारखे शब्द, आज अनेक वर्षे मराठी स्त्रियांची नावे आहेत. ही प्रथा हल्लीहल्ली वाढीस लागली आहे, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. मधु हे गोड अशा अर्थाचे विशेषण, तिन्ही लिंगांत चालणार. अर्थात मराठी मुलांना मधुकर, मधुसूदन ही, तर मुलींना मधुमती, मधुमालती, मधुलिका ही नावेदेखील आज अनेक वर्षे ठेवली जात आहेत. ज्याचा मधुसूदनाने वध केला तो मधु, हा पुरुष राक्षस असावा.
मराठीत अगदी इंग्रजी शब्दालासुद्धा लिंग असते. पण हल्लीहल्ली मराठीतल्या अनेक इंग्रजी शब्दांमध्ये लिंगबदल होताना दिसतो आहे. उदाहरणे अनेक देता येतील, उदा० गिफ्ट हा स्त्रीलिंगी शब्द दूरचित्रवाणीवर जवळजवळ रोज नपुंसकलिंगी ऐकावा लागतो. ऍक्टिंग नपुंसकलिंगी, हल्ली स्त्रीलिंगी झाले आहे. ई-मेल मला पुल्लिंगी वाटते, पण बरेच जण स्त्रीलिंगी वापरतात.
मराठीत दीर्घान्त होऊन आलेले शब्द तद्भव मानले जातात असे क्वचित दिसते. 'भीतीने' हा शब्द अनेकदा 'भितीने' असा वाचायला मिळतो. रीती आणि रीत हे अनुक्रमे तत्सम आणि तद्भव. एकाचे रूप रीतीने किंवा रीत्या होते तर दुसऱ्याचे रितीने. रित्या अर्थात चुकीचे. अशी आणखीही उदाहरणे असावीत. शोधावी लागतील. शुद्धलेखनाच्या नियमांतमात्र असे करण्याची तजवीज केलेली नाही. (शुद्धलेखनाचे नियम मनोगतावर आहेत!)--अद्वैतुल्लाखान