सद्ध्याच्या पिढीची सामान्यज्ञानाची  पातळी  पूर्वीच्या पिढीच्या पूर्वीच्या सामान्यज्ञानापेक्षा कमी असेल कदाचित पण सद्ध्याच्या तरुण पिढीचा दर्जा खालावलाय असे एकूणात म्हणता येणार नाही.‌शहरातली तरुण पिढी तरी सळसळती, उत्साहाने (क्वचित अतिउत्साहाने)भरलेली दिसते. महानगरातल्या अतिनिम्नस्तरामध्ये मात्र किंकर्तव्यता, गतानुगतिकता आणि मूढता दिसते, विशेषतः तरुण मुलींपेक्षा तरुण मुलांमध्ये. पण या वर्गातील मुले मॅनेजमेंट्च्या मुलाखतींना बहुधा येत नसावीत. दुसरं म्हणजे शिक्षणाचा प्रसार सार्वत्रिक होताना दर्जा थोडासा घसरणे क्षम्य वाटते. याच कल्पनेचा विस्तार म्हणजे पूर्वी सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिघाबाहेर असलेले लोक आज मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. त्यांना सांस्कृतिक विश्वातील घडामोडी अथवा तेथील दिग्गज यांबद्दल ममत्व न वाटणे समजू शकते. हेच इतर क्षेत्रांविषयी म्हणता येईल. ही सर्व क्षेत्रे त्यांच्या सद्ध्याच्या अनुभवविश्वाबाहेरची आहेत. त्यांच्या अंतःसंज्ञेमधे पिढीजातपणाने ती शिरलेली नाहीत.