समजा उसळ करायची झाली तर ती ठराविक मर्यादे पर्यंतच शिजवायला हवी तरच त्यातले घटक पदार्थ म्हणजे चवळी, मटार, मूग, वाटाणा, वाल यांची सरमिसळ होऊन देखील प्रत्येकीची वेगळी चव लागते आणि ऊसळ चावून खाण्याची मजा येते.
भाताचं तसंच आहे, व्यक्तीशः मला प्रत्येक तांदळाचा दाणा न तुटलेला आणि वेगळा दिसेल असा भात आवडतो, मग तो केशरी भात असो की पुलाव की रोजचा वरण भात, यामुळे खुद्द तांदळाचा स्वाद तुम्हाला घेता येतो. अर्थात हे बासमती तांदळातच शक्य आहे, इतर तांदळात सगळा तांदूळ एकमेकांत मिसळून काही तरी वेगळीच टेस्ट येते आणि ती प्रामुख्यानी वरणाची असते, तांदळाची नसते.
मिक्स वेज मध्ये तेच सूत्र आहे पण पाव भाजीच्या भाजीत सगळं एकमेकांत पूर्ण मिसळून जावं अशी कल्पना आहे, पण त्यामुळे तुम्हाला भाज्यांचा आस्वाद घेता येत नाही एक संमिश्र स्वाद तयार होतो. पाव भाजीचं एक सोडलं तर इतर बाबतीत मात्र सर्व पदार्थांची स्वभाव वैशिष्ठ्य, म्हणजे त्यांचा वेगळेपणा जपत रेसिपी करणं हे पाककलेचं कौशल्य आहे.