भारतीय परंपरेत चार वेद, त्याचे आठ अंग म्हणजे शाखा,

वेद चार हे खरे असले तरी वेदांगे सहा, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प, छंद आणि शिक्षा. जास्त माहिती  इथे वाचा

ह्या वेदांचे प्राकृत भाषेतून केलेले विश्लेषण म्हणजे उपनिषद

ही व्याख्या तितकीशी बरोबर नाही. वेद आणि उपनिषदे यांचा संबंध गुंतागुंतीचा आहे. वेदांमध्ये मुख्य भाग यातुविद्येचा आहे. म्हणजे काही भौतिक गोष्ट साध्य करण्यासाठी कर्मकांड, मंत्र वगैरे उदा. पाऊस पडावा म्हणून पर्जन्यसूक्त. उपनिषदांमध्ये शुद्ध आत्मविद्या आहे. याचा अर्थ असा नाही की वेदांमध्ये आत्मविद्या अजिबात नाही. ईशावास्य हे उपनिषद तर यजुर्वेदाच्या चाळीसावा अध्यायाचा भाग आहे. समाजात वेदांची  शिकवणी सोपी करून सांगणारी ती उपनिषदे अशी धारणा असली तरी एक विचारधारा अशी आहे की वेदांमधल्या कर्मकांडाच्या अवडंबराच्या विरुद्ध बंड म्हणून आत्मविद्या सांगणाऱ्या उपनिषदांची निर्मिती झाली.

याबाबतीत स. रा. गाडगीळ यांनी विचार मांडला होता आणि त्याचे कुरुंदकरांनी समर्थन केले होते. तो असा की यातुविद्येचा पुढचा भाग म्हणून  भक्तिमार्गाची उत्पत्ती होऊ शकेल पण  यातुविद्येतून आत्मविद्येची निर्मिती होऊ शकणार नाही. याचाच अर्थ असा की उपनिषदे हा वेदांचा पुढचा भाग म्हणण्यापेक्षा उपनिषदे हे वेदांविरुद्ध (त्यातल्या कर्मकांडे, यातुविद्या यांच्याविरुद्ध) केलेले बंड म्हणणे जास्त योग्य ठरेल.

वेदकाळा पासून सृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात उच्च पातळी गाठणारे गुरू, ऋषी मुनिजन मान्यता मिळवलेले होते त्यांच्या शिष्यगणांना ठरावीक पातळी गाठल्यावर ब्राम्हण ही पदवी दिलेली आहे.

हेही  बरोबर नाही.  उच्च पातळी गाठणाऱ्यांना ऋषी म्हणून मान्यता असली तरी ब्राह्मण म्हणून मान्यता होती याबद्दल मी साशंक आहे. अगदी रामायणातले उदाहरण घ्या. वसिष्ठ आणि विश्वामित्र दोघेही ऋषी,  पण वसिष्ठ ब्राह्मण आणि विश्वामित्र क्षत्रिय. महाभारत काळात द्रोणाचार्य आणि कृपाचार्य ब्राह्मण, भीष्म क्षत्रिय, जरी सर्वजण धनुर्विद्येची उपासना करणारे असले तरी. कर्माने क्षत्रिय असूनही द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून नाकारले. त्यामुळे भवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेली "गुणकर्मविभागशः" वर्णव्यवस्था नेमकी कुठल्या काळात प्रचलित होती हा मला पडलेला  प्रश्न आहे.

कुंभार, जांभार, सुतार, लोहार, कुणबी वगैरे प्रत्येक जातीत ब्राम्हण पातळीचे आचार - विचार असणारी व्यक्ती असतेच. कारण अशी व्यक्ती त्या जातीचा सखोल अभ्यास करणारी असते, त्या जातीला जास्त निरोगी ठेवण्याचा, उत्कर्षाचा प्रयत्न करणारी असते.

असे असले तरी त्या व्यक्तीला ब्राह्मण समजतात का? साधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण घ्या. जन्माने महार असले तरी विद्वत्तेमध्ये कुठल्याही ब्राह्मणापेक्षा कमी नव्हते. सर्वसामान्य मनुष्य त्यांना ब्राह्मण समजतो का?

वर्णव्यवस्था कशी निर्माण झाली असावी याबद्दल आपण विवेचन केले आहे. याबाबतीत कुरुंदकरांनी क्रांतीकारक विचार मांडला आहे. सर्वसाधारण समज असा की आधी चार वर्ण झाले आणि त्यातून जाती उत्पन्न झाल्या. ऋग्वेदामध्ये पुरूषसूक्तात असलेल्या "ब्राह्मणो~स्य मुखम्  आसीत्" या ऋचेवरून (अर्थ - ब्राह्मण समाजपुरुषाचे मुख आहेत,  क्षत्रिय बाहू आहेत, वैश्य मांडी आणि शूद्र पाय) हा समज दृढ झाला. कुरुंदकरांचे म्हणणे असे की प्रथम फक्त जाती होत्या. त्या काळी अस्तित्त्वात असलेल्या जातींना चार वर्णांमध्ये कोंबून बसवण्याचे काम नंतर झाले. आजच्या समाजात वर्ण प्रायशः दिसत नाहीत, फक्त जाती दिसतात. व्यक्तींना जातीचा जितका अभिमान असतो तितका वर्णाचा असल्याचे दिसत नाही. वर्ण असल्याचा भ्रम होतो कारण ब्राह्मण ही जातही आहे आणि वर्णही. त्यांनी एक उदाहरण दिले होते. समजा एक शेतकरी आहे. जेमतेम एक एकर शेती असणारा. हा शेती करतो म्हणून शुद्र आहे. जास्तीचे धान्य बाजारात विकतो म्हणून वैश्य आहे आणि सहसा शेतावर कोणी हल्ला केल्यास त्याचा प्रतिकार करतो म्हणून क्षत्रितही आहे. त्यातून समजा थोडा धार्मिक वृत्तीचा असेल, पूजापाठ करत असेल  तर ब्राह्मणही म्हणता येईल. अश्यावेळी त्याचा वर्ण कुठला ठरवणार?

सत्यनारायणाच्या पूजेच्या अर्वाचीनपणाबद्दल लतापुष्पा यांनी लिहिले आहेच. मीसुद्धा ही प्रथा पेशवाईच्या काळात सुरू झाल्याचे वाचले असेल. कदाचित ते चुकीचे असून त्या म्हणतात तसे ब्राह्मो समाजामुळे ती प्रथा सुरू झाली असेल.

थोडक्यात जातपात, वर्णव्यवस्था, वेद - उपनिषदे, या विषयांवर गंभीरपणे लिहिताना थोडेसे वाचन केल्यावर गोष्टी वरकरणी जितक्या सोप्या वाटतात त्यापेक्षा गुंतागुंतीच्या आहेत असे लक्षात येते.

विनायक