माझी विचार करण्याची पध्दती क्रियेला प्रतिक्रीया अशी आहे. ती इतरांना मान्यच असावी हा माझा हट्टाहास नाही, नसणार. माझ्या क्षमते नुसार मी माझ्या भोवतालच्या जगाचा शोध घेतला. मला वेडा ठरवणारा मूळात हुशार आहे का? मला पशू ठवणारा नक्कीच मानव नाही. कारण त्यालाच मानव काय हे कळले नसावे. तो जर मानव आहे तर माझ्यातला मानव समजण्याची क्षमता त्याला का नाही? माझ्या वर संस्कार ज्याने जेव्हा केले ते बरोबर / चूक कोणी ठरवले? झालेल्या संस्कारांना काळ-वेळ-स्थानाच्या मर्यादा होत्या व आहेत, हे माझ्या वर संस्कार करणार्याला का समजले नाही?
ह्याचा दाखला म्हणून हा एक प्रसंग - एखादी लपवलेली खाण्याची वस्तू मी शोधून खातो त्या करता मला चोर ठरवून माझी आई मला चोपून काढते, पण मोठा भाऊ तोच लपवलेला पदार्थ शोधून खातो ती चोरी का झाली नाही? ह्यावर माझी प्रतिक्रिया - मी घरात पैसे कमावून आणित नाही पण मोठा भाऊ पैसे कमावून आणतो म्हणून ती चोरी नाही, हे माझ्या आईला पटले नाही, उलटे उत्तर दिल्या बद्दल पुन्हा थोडा मार सहन करावा लागला.
वरील प्रसंगाचे मर्म, माझ्या क्षमते नुसार मी जाणले, "ज्याच्या हातात काठी तो खरा." मग धर्म, नियम, खरे / खोटे ठरवण्याचा हक्क काठीवाल्याचा असणार. समाजात वावरताना मी हेच अनुभवतो आहे. आक्रमकांनी सगळे ठरवले व मान्य कारावे लागले. पण गुलामगिरी संपली ह्याचे मोजमाप काय? कारण काय - कसे मोजमाप करायचे हे त्या आक्रमकानेच ठरवले व मान्य कारावे लागले. आक्रमकाची स्तुती करणारा सुखी झाला (संधीसाधू, जगणे हा एकच उद्देश), मान्य करणार्याला जीवदान मिळाले, विरोधकाने जीव गमावला, कोणाचे चुकले? ह्यालाच नशीब म्हणायचे की त्याच्या कर्माची फळं? म्हणजे पुन्हा शोध सुरु. मी इथे जन्म घेतला, हे कोणत्या कर्माचे फळ मी समजायचे? हे सगळे सोडून, मी असा आहे हा संदर्भ समजून मी कोणता मार्ग ठरवायचा ह्याचा शोध सुरु आहे.