'चव्हाटा' आणि 'चव्हाण' यांचा काहीही संबंध नाही. 'चव्हाटा' किंवा 'चवाठा' म्हणजे (मोल्सवर्थभटानुसार) 'चौक' किंवा 'जेथे चार टवाळ टाळकी कुचाळक्या करायला जमतात अशी कोणतीही जागा, उदा. गुत्ता, केशकर्तनालय, झाडाचा पार, इ. '. तर मराठा समाजातील 'चव्हाण' हे कुलनाम हा राजपुतांमधील 'चौहान' या कुलनामाचा मराठी अपभ्रंश आहे. ('चौहान'ची व्युत्पत्ती 'चह्वान' अर्थात 'चतुर्भुज'पासून आहे, अशी माहिती या विकीदुव्यावरून मिळते; मात्र या दुव्यावरील माहितीच्या अचूकतेबद्दल शंभर टक्के खात्री नाही. तरी शक्यता बरीच वाटते.)
'कदम'चा उगम 'कदंब' या वंशनामापासून सांगितला जातो, तो 'मुकादमा'पेक्षा कैक पटीने अधिक सयुक्तिक वाटतो.
(आणि हो, 'शेट्टी' हे बहुधा मूळचे 'श्रेष्ठी' असावेत. अन्यथा, मराठी भाषेतील 'शेती'पासून तुळूभाषकांमध्ये 'शेट्टी' हे कुलनाम निर्माण होण्याचे काहीच सयुक्तिक कारण दिसत नाही.)
'भूमिती'चा 'भूमीच्या नीती'शी दूरचाही संबंध नाही. 'भू + मिती' (समांतर: 'Geo + metry') = 'जमिनीचे मोजमाप' असा सरळसरळ मामला आहे.
(एकंदरीत, व्युत्पत्तींच्या बाबतीत बराच 'घोळ घातला गेला' आहे, असे दिसते.)
बाकी, असल्या मनाला येतील त्या व्युत्पत्ती डोळे झाकून बिनधास्तपणे ठोकून देणे आणि वर त्यावर आक्षेप घेणाऱ्यास 'लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणाचे पदवीधर' वगैरे म्हणणे, हीच एक भली मोठी टगेगिरी वाटते. असो.
अवांतर: मते पटत नसतील, तर आजकाल लॉर्ड मेकॉलेच्या नावाखाली वाटेल त्याला 'खपवता' येते, असे दिसते. हा नेमक्या कोणाच्या शिक्षणपद्धतीचा परिपाक आहे, आणि अशा शिक्षणाची पदवी नेमके कोठे शिकून मिळते, नकळे.