मुळातच अभ्यासू वृत्तीमुळे ब्राम्हण कुळातील तरुणांची संख्या जास्त होती. तसेच इंग्रज राजवटीच्या विरोधात ब्राम्हण कुळातील तरुणांची संख्या पण जास्त होती. कारण त्याच ब्राम्हण कुळातील तरुणांना त्या शिक्षण पद्धतीचा खरा डाव लवकर लक्षात आला होता.
मी श्री. व्हिके यांच्या लेखनाचा समर्थक नाही हे मी धर्म, समाज, जातपात यावर दिलेल्या प्रतिसादावरून लक्षात यावे. तरीही सुरूवातीला शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये ब्राह्मणांची संख्या बरीच जास्त होती हे खरे आहे. आता पुरावा द्यायचा म्हणजे त्याकाळची गॅझेटस वगैरे वाचून कुठल्या शाळेत एकूण किती मुले होती आणि त्यापैकी किती ब्राह्मण होती हे शोधावे लागेल आणि ते माझ्या आवाक्याबाहेर आहेचे. म्हणून माझे म्हणणे वेगळ्या पद्धतीने सांगतो. साधारण इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यापासून म्हणजे सन १८२५ (बहुधा या वर्षी बाळशास्त्री जांभेकर व्ह. फा. झाले असावेत म्हणून हे वर्ष) पासून १९०० पर्यंतच्या काळातल्या प्रसिद्ध व्यक्तींचा आढावा घेऊ.
इंग्रजी शिकलेल्यांमध्ये पहिले नाव बाळशास्त्री जांभेकरांचे (१८१२-१८४६). त्याकाळची व्ह. फा. परीक्षा १२ भाषांसह चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाल्याने त्यांना बालबृहस्पती म्हणत. पुढे त्यांनी इंग्रज सरकारला शाळांचे अभ्यासक्रम ठरवणे, शाळांचे इन्स्पेक्शन करणे वगैरे कामांमध्ये मोलाची मदत केली (यामुळे आपली शिक्षणपद्धती मेकॉलेपद्धत नसून जांभेकरपद्धत आहे असे म्हणावे का? ) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठीतले पहिले वृत्तपत्र "मुंबई वृत्तदर्पण" सुरू केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठ स्थापन झाले. १८६२ सालच्या बी. ए. च्या पहिल्या बॅचमध्ये जे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले ते म्हणजे महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, वामन आबाजी मोडक, आणि चौथे (बहुतेक) दादोबा पांडुरंग. लोकहितवादींनीही (गोपाळ हरी देशमुख) इंग्रजी शिक्षण घेतले होते. त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर हे प्रसिद्धच आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीमध्ये वरील तिघांबरोबरच महादेव नामजोशी, धारप, वासुदेवराव केळकर, गोपाळकृष्ण गोखले, वा. शि. आपटे या लोकांचा समावेश होता. पुढे धोंडो केशव कर्वे त्यामध्ये गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्याशिवाय त्या काळात भारताचार्य चिंतामणराव वैद्य, सार्वजनिक सभेचे "सार्वजनिक काका" म्हणून प्रसिद्ध असलेले (ज्यांनी वासुदेव बळवंतांचे वकीलपत्र घेतेले होते) वासुकाका जोशी, रँग्लर परांजपे,अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि त्यांचे विक्षिप्त यजमान गोपाळराव जोशी, काशीबाई कानिटकर. ही सर्व मंडळी ब्राह्मण.
ब्राह्मण नसलेले ठळक उदारहण म्हणजे जोतिराव फुले.
त्यामुळे या काळात शिक्षण घेणाऱ्यांमध्ये ब्राह्मण लोकांची संख्या लक्षणीय होती हे विधान पटण्यासारखे आहे. बाकी अभ्यासू वृत्तीमुळे ही संख्या जास्त होती हे तितके पटत नाही. जातिव्यवस्थेमध्ये स्वतंत्र उद्योगधंदा नसल्याने आणि पिढीजात शिकणे, शिकवणे करत असल्याने आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी शिक्षण घेतल्याने आर्थिक फायदा होतो हे चटकन लक्षात आल्याने हे घडले असावे.
वरील यादी पाहिली तर किती लोक इंग्रजी राजवटीच्या विरोधी होते? किंवा त्यांच्या लक्षात इंग्रजांचा डाव आला होता? चिपळूणकर - टिळक - आगरकर इतकेच. त्यातही इंग्रजविरोधी लढा दिला फक्त टिळकांनीच. वासुदेव बळवंत फडक्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले हे खरे असले तरी त्यामागे खरे कारण हे इंग्रज ऑफिसरने त्यांना आईच्या आजारपणासाठी रजा नाकारली आणि त्यांची - आईची भेट झाली नाही म्हणून ते संतापले असे वाचले आहे.
इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या लोकांचा आणखी एक गट आहे तो म्हणजे उत्तरेतल्या बंडवाल्या मराठी लोकांचा. पुन्हा त्यात नानासाहेब आणि रावसाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे हे लोक ब्राह्मण. यातले नानासाहेब आणि राणी हे स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढले. परंतु यापैकी कोणालाही इंग्रज शिक्षण पद्धतीचा डाव लक्षात आला होता असे म्हणता येत नाही.
विनायक