चहा हा थोडाफार त्याची सवय लावणारा म्हणजे हॅबिट फॉर्मिंग असतो. चहाच्या रोजच्या ठरलेल्या वेळी तो प्यावासा वाटू लागतो .त्याची तलफ येते. मग चहा अटळ होऊन बसतो. जुन्या पिढीतल्या कॉलेज कट्ट्यांवर जेव्हा चहा'मारण्या'ची स्टाइल होती तेव्हा अशा अट्टल आणि अटळ चहावाल्यांना चहाटळ हे नामाभिधान असे. एका चहाच्या प्याल्यावर चहाटळपणाला ऊत येत असे. आता बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये जाऊन कॉफी पिण्याची स्टाइल आहे आणि सवय लावू शकणारे एकसे एक 'आयटेम' उपलब्ध आहेत.
ब्रिटिश मळेवाल्यांनी जेव्हा भारतात धंदेवाईकपणाने चहाची लागवड आणि विक्री सुरू केली तेव्हा भारतीयांनी त्याकडे चक्क पाठ फिरवली. ह्या रक्तवर्णी आणि चमत्कारिक वासाच्या पेयामध्ये कदाचित कसलातरी सामिष पदार्थ मिसळलेला असेल आणि बाटवाबाटवीसाठीच इंग्रज लोक ते खपवण्याच्या मागे आहेत असे त्यांना वाटले. मग मळेवाल्यांनी एक युक्ती केली. चहा हा कामोत्तेजक असतो अशी बातमी त्यांनी बाजारात सोडली. हा हा म्हणता आधी भारतीय पुरुष आणि त्यांच्यामागून इतर सर्वच चहाचे गुलाम झाले!
अर्थात आपण सर्वांनीच तो घ्यावा, प्यावा, प्राशन करावा वगैरे वगैरे.