ध्द आणि ध्ध ही अक्षरे लिहिण्याचा वेडेपणा फक्त मराठीभाषक आणि गुजराथीभाषक करतात. या दोन्ही राज्यांमध्ये संस्कृतचे अध्ययन जवळजवळ थांबले असल्याने असे का लिहू नये हे त्यांना सांगणारे शिक्षक आता कमी झाले आहेत.
मराठीत एकूण दहा हकारयुक्त व्यंजने आहेत. ख-छ-ठ-थ-फ आणि घ-झ-ढ-ध-भ. यांतल्या दुसऱ्या पाचांना फक्त य-र-ल-व-ण-न-म ही सातच व्यंजने जोडता येतात. त्यामुळे अर्घ्य, व्याघ्र, ओझ्याने, मढ्याला, विघ्न, अभ्रा हे शब्द बनतात. पहिल्या पाचांना म्हणजे, ख-छ-ठ-थ-फ यांना यरलवणनम ही व्यंजने लागतातच पण त्यांशिवाय तीच व्यंजने लागून त्यांचे द्वित्त बनते, आणि लख्ख, कछ्छा, लठ्ठ, जथ्था, लफ्फा असले शब्द बनू शकतात. या हकारयुक्त व्यंजनांना इतर कुठलीही व्यंजने लागू शकत नसल्याने ध्द आणि ध्ध असली जोडाक्षरे कुठल्याही भारतीय भाषांत नसतात.