प्रकरणाची केळकरांच्या टिळकचरित्रामधून बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेली हकीकत अशी.
१८९१ मध्ये टिळक आणि रानडे पंचहौद मिशनमध्ये तिथल्या ख्रिश्चन धर्मगुरूंच्या आमंत्रणावरून त्यांच्याशी धार्मिक चर्चा करायला गेले होते. तेव्हा तिथे त्यांनी चहा आणि बिस्कीटे सेवन केल्याची वदंता पसरली (खात्री नाही पण त्यावेळी उपस्थित असलेले आनंदीबाईंचे विक्षिप्त यजमान गोपाळराव जोश्यांनी खोडसाळपणा करून हे जाहीर केले आणि टिळक - रानड्यांना अडचणीत आणले असे वाचले आहे) आणि त्यामुळे ते बाटले असे लोकांना वाटून कर्मठ हिंदूनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर बहिष्कार घातला. एकवेळ नुसता चहा घेतला असता तरी चालले असते पण बिस्कीटे म्हणजे जास्तच झाले अशी धर्ममार्तंडांची भावना झाली. मग नुसता चहा कोणी घेतला आणि चहा - बिस्कीटे कोणी सेवन केली यावर बरीच भवती- न- भवती झाली. बहिष्कारामुळे रानडे कुटुंबियांची जास्त पंचाईत झाली. त्यांच्या घरची धार्मिक कार्ये थांबली. टिळक कुटुंबियांचे उपाध्ये ठरलेले असल्याने त्यांच्यावर जास्त परिणाम झाला नाही. त्यामुळे रानड्यांनी आधी शरणागती पत्करून प्रायश्चित्त घेतले. तर टिळकांनी बऱ्याच दिवसांनी "मी काशीला जाऊन प्रायचित्त घेऊन आलो आहे" असे घोषित केले. या प्रकरणात रानड्यांची सरळ तर टिळकांची तिरकस वृती दिसते असे केळकरांचे मत होते.
पंचहौद मिशनबद्दल थोडीशी माहिती इथे आणि इथे वाचता येईल.
विनायक