कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला सत्य नारायणाच्या पूजेने सुरुवात करण्याचा नियम तयार झाला. ह्या पूजेला हजर असणार्‍या प्रत्येकाला पूजेला बसणार्‍या व्यक्तीचे गोत्र, जात, पोटजात, नियम, कर्तव्ये ह्यांची आठवण करून देण्याचा हा एक साधा मार्ग होता व आहे हे मला समजले. पुजा सांगणार्‍या पुजार्‍याचे (ती व्यक्ती ब्राम्हण असावी हा नियम नव्हता) हे कर्तव्य होते की त्याने पूजेला बसणार्‍या व्यक्तीच्या परंपरेची, तपशीलवार माहितीची उजळणी करूनच पूजेला सुरुवात करणे आवश्यक ठरले होते

ही माहिती कुठून मिळवलीत? कुठे दिली आहे? काही पुरावा?

माझ्या माहितीनुसार १९ व्या शतकात सत्यनारायण बंगालमध्ये सुरू झाला तो 'साचा पीर' ह्या मुसलमान समाजाच्या उत्सवाचे हिंदू रूप म्हणून.  साचा = सत्य, आणि 'पीर' चा नारायण झाला. ह्याला मुहूर्त, सोवळे ओवळ्याची विशेष आवश्यकता नसल्याने हा सत्यनारायण अल्पावधीतच लोकप्रिय झाला. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

अवांतरः विनोद म्हणजे विघ्नहर्ता गजानन जिथे विराजमान असतो तिथेच अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी पुण्यात (मला पुण्याचंच माहिती आहे म्हणून पुण्याचा उल्लेख) सत्यनारायणची देखील पूजा होते. आता इथे कोणतं महत्त्वाचं कार्य होत असतं कोण जाणे आणि कार्य सिद्धीस नेण्यास गजानन मांडवात असताना सत्यनारायण कशाला कोण जाणे? असो. आपल्याकडे देवासमोर स्पिकर्सच्या भिंती लावून फिल्मी गाण्यांवर नाचूनही भक्तांची ब्रह्मानंदी टाळी लागते तर एकाच मांडवात दोन वेगळ्या देवांची पूजा कराविशी वाटणे म्हणजे सत्कारास पात्र वर्तन आहे.

उपनिषदांबाबत विनायक यांच्याशी सहमत. उपनिषदाचा शब्दशः अर्थ जवळ बसणे अर्थात गुरूच्या अगदी जवळच्या शिष्यांना, शिष्योत्तमांनाच उपनिषदे शिकण्याचा अधिकार असे आणि ती इतर कोणालाही सांगू नयेत अशी अट असे.

ह्या वेदांचे प्राकृत भाषेतून केलेले विश्लेषण म्हणजे उपनिषद.

उपनिषदे प्राकृतात नाहीत. संस्कृतातच आहेत. 

आता प्राकृत भाषा असे म्हणले तर कोणती प्राकृत असा प्रश्न लगेच येतो. कारण या भाषेचे प्रदेशानुसार प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशात बोलली, लिहिली जाणारी प्राकृत वेगवेगळी आहे. त्यापैकी काही प्रकार : 

मागधी (मगधात बोलली जाणारी), अर्धमागधी (अर्धे मगध जी भाषा बोलते ती, किंवा मागधीतील अर्धे अधिक शब्द ज्यात आहेत ती), पैशाची, पाली (गौतम बुद्धांचा उपदेश या भाषेतून आहे.), शौरसेनी (शूरसेन नावाच्या गणराज्यात ही बोलली जात असे), महाराष्ट्री (ही महाराष्ट्रात बोलली जात असे हे वेगळे सांगायला नकोच. संत ज्ञानेश्वरांचे साहित्य ह्या भाषेत आहे. याचीच पुढे मरहट्टी आणि मग मराठी झाली.)