शंकराची नावे आणि भिषज ह्या दोन्ही गोष्टी वरील काही प्रतिसादांमध्ये एकत्र आल्यामुळे एक श्लोक आठवला. थोडे विषयांतर आहे पण ते मनोरंजक वाटेल अशी आशा आहे.  हा शंकर-पार्वती यांच्यातील संवाद आहे.

कस्वं शूली मृगय भिषजं नीलकण्ठः प्रियेऽहम् ।
केकामेकां कुरु पशुपतिर्नै व दृश्ये विषाणे ।
स्थाणुर्मुग्धे न वदति तरुः प्राणनाथः शिवाया: ।
गच्छाटव्याम् इति गिरिजया पातु वश्चन्द्रचूडः ॥ 

अर्थ :-

पार्वती : कोण आहेस?
शंकर : मी शूली ((त्रि)शूलधारी=शंकर/ वेदनाग्रस्त)
पार्वति : मग वैद्याला शोध.
शंकर : प्रिये, मी नीलकंठ. (शंकर / मोर)
पार्वती : (मग) मोरासारखे ओरडून दाखव.
शंकर : (अगं, मी) पशुपती (शंकर / बैल)
पार्वती : (बैल?) पण शिंगं तर दिसत नाहीत!
शंकर : (अगं) वेडे, मी स्थाणु (शंकर/ वृक्ष)
पार्वती : पण झाड तर बोलत नाही.
शंकर : मी शिवेचा पती (शिवा = पार्वती/ कोल्ही)
पार्वती : (मग) अरण्यात जा.

अशा रीतीने पार्वतीकडून निरुत्तर झालेला शंकर तुमचे रक्षण करो.

(आधार : अभिनव सुभाषिते (राजहंस प्रकाशन)  ले. - वीणा सातपुते)