भारतातला स्वैराचार, अराजक, बेबंदशाही ह्या आजकालच्या गोष्टी नव्हेत.आपल्या देशात नागरी नियमांनी बांधलेली अशी सिविल सोसायटी  निर्माण होण्यासाठी खूप काळ जावा लागेल. आपला बहुसंख्य समाज हा अजूनही  आदिम, टोळ्याटोळ्यांनी बनलेल्या मानवाच्या अवस्थेतच आहे. ब्रिटिशांनी त्यात थोडीफार नागरी  शिस्तबद्धता आणण्याचा प्रयत्न केला. ठग-पेंढाऱ्यांचा बंदोबस्त,सतीबंदी कायदा, दिवाणी कोर्टांची स्थापना, सुबद्ध आणि सुस्पष्ट अशी कोड-बिले आणि कायदे  इत्यादि गोष्टी त्यांनी अंमलात आणल्या. तत्पूर्वी ग्रामसभा, जातपंचायती, धर्मसभा अशा संस्था  सामाजिक आणि दिवाणी बाबातीत निर्णय घेत. ह्या निर्णयांचा समतोलपणा आणि न्यायीपणा शंकास्पद असे. काही जणांची टोळी आणि त्यांचा एक सरदार किंवा मुखिया अशा व्यवस्थेत आधुनिक कायद्याची अंमलबजावणी सक्तीने करणे यशस्कर ठरत नाही. अशिक्षित सरदारांच्या अनिर्बंध स्वातंत्र्यावर गदा आलेली ते खपवून घेत नाहीत. त्यांच्या तथाकथित प्रजेलाही ते आपल्याबरोबर फरफटत नेतात. जाट प्रदेशातल्या खप-पंचायती हे याचे अगदी समर्पक उदाहरण आहे. बहुसंख्य लोकांना कोर्टाचे कायदे हे आपले नव्हेत असे वाटते ह्याचे कारण ते ब्रिटिशांनी त्यांच्या शासनपद्धतीनुसार बनवलेले आहेत हे नसून कायद्याने बांधलेले राहाण्याची मानसिकता अजून  आपण कमावलेली नाही आणि ते कायदे ज्या आधुनिक जीवन पद्धतीचा पुरस्कार करतात ती  आपल्या  आचारविचारपद्धतीत अजूनही सर्वार्थाने भिनलेली नाही.  पुरुषांनी रस्त्यावर पान खाऊन थुंकणे, कुठेही मलमूत्रविसर्जन करणे,मूल नाही किंवा पुंलिंगी मूल नाही म्हणून बायकोला हाकलून लावणे, मारझोड करणे, अधिकृत किंवा अनधिकृत सवत आणणे ही सारी या पुरुषी वर्चस्वाच्या मध्ययुगीन सरंजामशाही  जीवनशैलीची शेलकी उदाहरणे आहेत. शहरांमधून आणखी एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे सार्वजनिक मालमत्तेविषयी अनास्था आणि हेळसांड. मुंबई मध्ये सार्वजनिक टेलेफोन, रेल्वे कूपन्स वर शिक्का मारून देणारी यंत्रे, नव्या कोऱ्या बस अथवा रेल्वे गाड्या ,यांची हाताळणी अथवा वापर  लोकांकडून अत्यंत बेफिकीरीने केला जातो. यामागे एक तर आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वस्तू वापरण्याविषयी अज्ञान असते आणि दुसरे म्हणजे सिविक सेंस चा अभाव. प्रगत समाजाचा अविभाज्य घटक असणारी ही नागरी संवेदनशीलता आपल्यामध्ये येणे ही आत्यंतिक गरजेची गोष्ट होऊन बसलेली आहे.