माझे मत थोडे वेगळे आहे. एक उदाहरण तेलगू देसमचे. आंध्र प्रदेशची  प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी काँग्रेसला विरोध म्हणून हा पक्ष १९८१ साली स्थापन झाला. तेलगू देसमला आंध्रप्रदेश मध्ये १९८२ निवडणुकांमध्ये किती जागा मिळाल्या १९९ (आणि आधी सत्तेत असलेल्या काँग्रेसला ६०) . तेलगू देसमच्या अधिकृत स्थळावर ही माहीती तुम्हाला मिळेलच. आज तिकडे काँग्रेससुद्धा (आणि भाजपासुद्धा) प्रादेशिक अस्मितेला टाळू शकत नाहि इतका त्यांनी धसका घेतला आहे.

शिवसेनेची स्थापना १९६६ सालची. मराठी माणसाची परिस्थिती आंध्रपेक्षा बिकट. तरीही मुंबई महापालिकेत पूर्ण बहुमत मिळवायला १९८५ साल उजाडावे लागले. आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवायला १९९५ (तीसुद्धा भाजपाच्या आणि अपक्षांच्या मदतीने आणि तीसुद्धा राममंदिराचा मुद्दा आला म्हणून !!) वा रे मराठी माणूस !!!!.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेला संकुचित विचारांचे म्हणून हिणवणारे कोण ? मराठी. शिवसेनेला (वसंतसेना/गुंडसेना म्हणून हिणवणारे कोण ? मराठी.  (अरे हो!! तो नाना आजकाल काय करतो ? तर मुंबईच्या रस्त्यांवर लोकांच्या कानफटांवर पिस्तूल ठेवून दमबाजी. बहुतेक त्याला त्याची प्रतिमा मोडायचा अधिकार आहे,  कारण हिंदीत यशस्वी असलेला एक उत्तम मराठी अभिनेता म्हणून आमच्या मनात त्याची प्रतिमा होती )

आपल्या मराठी लोकांचे एक बरे असते. शिवसेनेने मराठी माणसांसाठी काहिही केले नाहि हे सांगितले (आणि काय केले हे सोयिस्कर विसरले) कि आपला मराठीचा अभिमान सिद्ध होतो.  मग शिवसेनेला उत्तर भारतीयांचे मेळावे महाराष्ट्रात का घ्यावे लागतात हा प्रश्न स्वतःला नाही पडला तरी चालतो.  

राज्यात बसून राष्ट्राचे राजकारण वगैरे इथे मनोगतावर लिहायला सोपे आहे हो (हे वाक्य टाईप करायला १० मिनटेच लागली फक्त). करायची वेळ येते तेव्हा कळते की त्यासाठी पाठिशी खासदारांचे / आमदारांचे बळ लागते. आता आपण इतर राज्यांतील नेत्यांबद्दल जे बोलतो त्यांचे त्यांच्या राज्यातील बळ बघा आणि काँग्रेस आणि भाजपावरील त्यांचा वचक बघा.  महाराष्ट्रात शिवसेना भाजपाच्या थोडीशीच पुढे आहे पण त्यासाठी त्यांनी लढवलेल्या जागांची तुलना करा. भाजपाशी समझोता म्हणजे शिवसेनेला महाराष्ट्रात पसरण्याची संधी होती. नुसते मराठी मराठी करत बसले असते तर मुंबई (कितपत?), ठाण्यापलिकडे पोहोचले नसते. (किंबहुना भाजपाशी समझोता झाल्यामुळेच युतीचे ५२ आमदार १९९० साली निवडून येऊ शकले होते) तेव्हा शिवसेनेला उर्वरीत महाराष्ट्राशी काही देणेघेणे नव्हते असे म्हणण्यात काही अर्थ नाही. उलट उर्वरीत महाराष्ट्रालाच मुंबईची सोन्याची अंडी घेण्यातच फक्त मतलब होता. ही राखायची कशी त्याच्याशी काहीच देणेघेणे नव्हते.  
तरीही मलासुद्धा शिवसेनेने भाजपशी केलेली युती कधिच पटली नाहि. म्हणजे हिंदुत्व वगैरे ठीक आहे हो..पण जर बाहेरचे हिंदू इकडे येऊन मला घाटी म्हणून हिणवणार असतील तर खड्ड्यात गेले ते हिंदुत्व असेच मी म्हणेन. पण प्रश्न असा राहातो की मुंबईचा फायदा महाराष्ट्राला हवा असेल तर महाराष्ट्रात मुंबई राहीली पाहिजे. म्हणजे मराठी माणूस राहीला पाहीजे . काँग्रेसला सांगूनही ती समज येत नव्हती (म्हणजे शरद पवार , शंकरराव, सुधाकरराव इ., कारण माझ्यामते वसंतदादांपर्यंतच्या नेत्यांना ही समज चांगली होती. कदाचित राष्ट्रीय पक्ष म्हणून काही मर्यादा पडल्या असतील त्यामुळे त्यांना दोष देता येईल असे वाटत नाही.) अशावेळी शिवसेनेकडे दुसरा पर्याय नव्हता असे मला वाटते. भाजपाला जवळ केल्यानंतर पर्यायाने इतर राज्यातील लोकांबद्दलची वागणूक शिवसेनेला मवाळ करावी लागणार हे उघड होते. पण त्याची फिकीर शिवसेनेला इतकी वर्षे शिव्या देणाऱ्या मराठी माणसांनी पण करायला पाहिजे होती. सुरुवातीपासून एकत्र उभे राहिलो असतो तर ही वेळ न येती !!!

गेली ४० वर्षे बाळासाहेब मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी जे बोलत होते तेच आज आबा आणि विलासराव म्हणत सुटलेत.आबा आणि विलासरावांना इतक्या उशीरा का होईना पण जाग आली हेही नसे थोडके. अगदी ह्याचसाठी सामना मधून आबांच्या प्रत्येक भूमिकेला पाठिंबा मिळतो आहे . आता त्यांनीच सांगावे की जेव्हा बाळासाहेब जेव्हा हीच भूमिका मांडत होते तेव्हा त्यांनी पाठिंबा का नाही दिला. (आजकाल महाराष्ट्र टाईम्स ला पण काय कोण जाणे मराठी मुंबईचा एकदम पुळका आला आहे . बहुतेक खप कमी झाल्यावर एकदम मुंबईतून मराठी माणसे कमी झाल्याचे लक्षात आले असेल. आता शिवसेनेलाच अजून शिव्या द्यायला मोकळे!!!). एवढी वर्षे का विरोध केलात आणि आताच अगदी काय झाले हे विचारायची सोय नाही . श्रेय देण्याची तर बातच सोडा..

नारायण राणेंच्या बातम्या आपण सगळे मनोगत वर आणि इतर वृत्तपत्रांवर चवीने चघळतो आहोत. ठाकरेंनंतर शिवसेना कशी संपणार ह्याचे मनातल्या मनात गोड गोड हसत मांडे मांडतो आहोत. कोणीच कसा विचार करत नाहीत की शिवसेना संपल्यानंतर मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे सोपे जाईल. सध्या फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादि ह्यांच्यातच मला हा विरोध करायची ताकद दिसते. पण राष्ट्रवादीचा काय भरवसा? त्यांची सुरुवातच मुळात सोनिया गांधीना विरोध म्हणून झाली. उद्या शरद पवार राष्ट्रवादीचा पुलोद करणार नाहीत (सोनिया गांधींचे नाहितर राहुल किंवा प्रियांका गांधींचे हात बळकट करण्यासाठी) हे ते तरी सांगू शकतील काय.?

मराठी लोकांची मराठी अभिमानाची व्याख्या म्हणजे मुलांना मराठी माध्यमातून शिकवणे. माझ्यामते मुले चांगल्या पदांवर पोहोचून त्यांनी तिथून आपल्या मराठी भाषेचे संवर्धन करणे हे जास्त महत्वाचे आहे, मग ती कोणत्याही माध्यमातून शिकोत. इथे dallas मध्ये येऊन बघा जरा. तेलगू लोक कसे त्यांची भाषा जपतात ते ( त्यातील बरेच मुंबईत पण राहिले आहेत, पण एक हिंदी किंवा मराठी शब्द माहिती असेल तर शप्पथ."मुन्नाभाई एम.बी.बी. एस." नाहि बघत बिलकूल तर "शंकरदादा" बघतात) . तामिळी , केरळी , गुजराथी , पंजाबी लोकांचे काय वेगळे सांगू का? ज्या समाजाची प्रगती होते त्यांचीच भाषा आणि त्यांचेच साहित्य टिकते हे मी कशाला सांगायला हवे ? सध्या अमेरीकेतील डलास, सॅन होसे, न्यू जर्सी इ. शहरे , तेलगू  / गुजराथी, ह्यांच्या अधिपत्याखाली आहेत, आपण अजून मुंबईच वाचवतोय. ती गेल्यावर काही वर्षांनी पुना वाचवू (म्हणजे आधि पुनाचे पुणे करून घेऊ आणि ते घालवू , नंतर नागपोर (म्हणजे नागपूर) आणि नासिक (नाशिक).  (फक्त एका पानिपतात हरल्याची एवढी किंमत ? त्यापूर्वी अगदी १/२ भारतावर मराठे राज्य करत होते म्हणे)

मी हे पण मान्य करतो की शिवसेनेकडे मराठी माणसाला पुढे कसे आणायचे ह्याचा निश्चित आराखडा नव्हता (जरी त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले तरी). मुळात शिवसेनेत सामिल होणारे सामान्य शिवसैनिक, त्यांच्यातूनच बनलेले शाखाप्रमुख आणि इतर प्रमुख नेते ह्यांच्याकडे हे vision असणे शक्य नव्हते. तसे तर ते कोणाच राजकिय पक्षाकडे आणि नेत्याकडे नव्हते , नाहितर आज महाराष्ट्राची हि परीस्थिती नसती. (महाराष्ट्र - मुंबई < बिहार हे समिकरण अजूनही कोणालाच अस्वस्थ करत नाही ह्याचेच आश्चर्य वाटते).
 बाळासाहेबांनी संघटना ज्या पद्धतीने उभी केली ती पद्धत त्यावेळी कदाचित त्यावेळच्या शिवसैनिकांसाठी योग्य असेल, तरी आता चालेल असे वाटत नाही.  मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न संघटीतपणे करावे लागतील (काहितरी सॅटर्डे क्लबच्या मार्गाने). काँग्रेस किंवा राष्ट्रवादी उघडपणे ते करु शकणार नाहीत आणि भाजपाला त्याची फिकीर असणार नाही.  ह्या प्रयत्नांत सर्वांचा सहभाग लागेल आणि शिवसेना हि संघटना हे त्यासाठी उत्तम माध्यम असेल (अगदी शिवसेना(उ) शिवसेना (रा) शिवसेना (ना) झाली तरी, ((म) चा काय विचार)), मग तुम्ही शिवसेनेला आपला पक्ष माना किंवा मानू नका , ती पडताना हसा किंवा रडा किंवा टाळ्या पिटा . जे आपण आज पेरू त्याची फळे आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळतीलच.

"वयं पंचाधिकं शतम" - आठवून बघा आणि सांगा पटते का ते.