काही काही अगदी साध्या साध्या गोष्टी असतात पण तिथेही आपली भारतीय वृत्ती दिसून येते. गेल्या आठवड्यात माझ्या सहा वर्षाच्या मुलीला बागेत घेऊन गेले होते. ती खेळत होती. मी निवांत पुस्तक वाचत बसले होते. थोड्यावेळाने तिने बागेत जो काही थोडाफार कचरा होता तो उचलून कचरा पेटीत टाकला. (त्या पण जागोजागी असतात म्हणा आणि कचरा आतच पडलेला असतो, बाहेर नाही). मीच आधी कोणी पाहतय का म्हणून इकडे तिकडे पाहिलं. नंतर शरम वाटली मला, माझ्या तो कचरा लक्षातही आला नाही म्हणून. पण आला असता तरी मी उचलून टाकला असता का ही शंका आहे. मला वाटतं, आपण या गोष्टी कधी शिकलोच नाही. कारणं खूप आहेत पण दुःख होतं  ते याचंच की बाकी  नको ते सारं आपण पाश्चिमात्यांकडून उचलतो मग या अशा गोष्टी का नाही शिकत?