तो तमिळनाडूत लोकप्रिय होताच. आणि इथली त्याची लोकप्रियताही रोबोट पेक्षा तमिळ चित्रपटांमधील त्याच्या करामतींवरच अधारित आहे. तमिळ चित्रपटांमधून त्यानं सर्वशक्तिमान / चमत्कारी वाटावा इतका हरहुन्नरी / काहीही करू शकणारा अशा व्यक्तिरेखा साकारल्या. त्यामुळे तमिळ जनतेनं त्याची भक्ती केली आणि तमिळेतर जनतेनं उपहासात्मक प्रशंसेनं भरलेले विनोद केले. जसजसे तमिळ चित्रपट अधिक आक्रमकपणे महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ लागले, तसतसे हे विनोद आणखी मोठे झाले; आणि जसजसे हे विनोद मोठे झाले, तसतसा रजनीकांत मोठा झाला. तुम्ही म्हणता त्या चित्रपटांच्या काळात आंतरजालाची महासत्ता अस्तित्वात नव्हती. पण आता आंतरजालामुळे विनोद, माहिती, किस्से हे क्षणार्धात लाखो लोकांना माहित होतात. त्यामुळं लोकप्रियता वाढल्यासारखं वाटतं. शिवाय तो मुळात गायकवाड नावाचा मराठी माणूस आहे ही गोष्टही महाराष्ट्रातल्या त्याच्या लोकप्रियतेचं एक कारण असेल. मला मात्र प्रामाणिकपणे असं वाटतं की यात लोकप्रियतेपेक्षा उपहासात्मक विनोदच अधिक आहे.