मॅडम - मडमा - मडमेचे
अशी रुपे अगदी आता आता पर्यंत सर्रास होत असत.
थोडे विषयांतरः
(पाणिनीय) संस्कृतचे नियम बांधलेले आहेत. तर मराठीचे नियम "घडलेले", म्हणजे सर्वसामान्यांची भाषा अभ्यासून त्यांना नियमात बांधले गेले असावे असा माझा अंदाज आहे. त्यामुळे लोकं कळत - नकळत नियम पाळताना दिसतात. उदाहरण द्यायचे तर "लाईन" शब्दाचे देता येईल. जेव्हा एखादा हवालदार "ओ सायेब, आमाला आमच्या लायनीपरमाने जाऊ द्या" असे म्हणतो तेंव्हा तो स्वतःच्या नकळत निदान "लाईन" शब्दापुरता तरी नियम ८.३ चे तंतोतंत पालन करत असतो.
नियम ८.३ = शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई' च्या जागी 'य' आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात.
उदाहरणार्थ:काईल-कायलीला,देउळ-देवळाला,देवळांना
म्हणजे लाईनचे लायनीला, लायनीचे, लायनीप्रमाणे असे नियमित शब्द बनतात.
एखादा मनोगती लगेच "पद्धतीप्रमाणे" असा शब्द न वापरता "लायनीपरमाने" असा धेडगुजरी शब्द का वापरावा असा प्रश्न विचारू शकेल. सामान्य माणूस सहसा अस्सल मराठी शब्दाला प्राधान्य देतो. असा चपखल मराठी शब्द मिळाला नाही तर तो इतर भाषेमधून उधार-उसनवारी करतो. अशा वेळी त्याच्या दृष्टीने संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी धनकोच्या भूमिकेत उभ्या असतात. जिथून सोप्या पद्धतीने ऋण मिळेल आणि व्याज कमी पडेल अशा भाषेकडून शब्द घेऊन तो आपली संवादाची नड भागवून नेतो, फार मागचा - पुढचा विचार करण्याकरता ना वेळ असतो ना गरज.