सरकार अकार्यक्षम आणि भ्रष्ट आहे हे खरेच. पण रामदेवबाबाही नैतिकतेचा दावा करू शकणार नाहीत. अण्णांमुळे वातावरणनिर्मिती झालीच होती. तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायला रामदेवबाबा पुढे सरसावले यात नवल नाही. आपली आणि आपल्याशी संबंधित पक्षाची प्रतिमा उंचावणे हा त्यांचा अंतस्थ हेतू होता. फळांचा करंडा पाठवताना त्यावर "आंबे' अशी चिट्ठी लावली, आणि आतमध्ये भलतेच,अगदी सोने देखील निघाले तरी तो फ्रॉड, गफला, गुन्हा होतो. बाहेर एक आणि आतमध्ये एक अशा वृत्तीला ढोंग किंवा कपट म्हणतात. रामदेवबाबांना सूचना देऊन किंवा दिवसाढवळ्या त्यांना हद्दपार करायला पोलिस गेले असते तर त्यांनी सहज गुंगारा दिला असता. त्यांचे समर्थक जागे आणि सतर्क असताना पोलिसांना मोठ्या प्रमाणात दगडफेक किंवा तत्सम प्रकाराला तोंड द्यावे लागले असते. आजच्या मोबाइलच्या जमान्यात बातमी क्षणार्धात सर्वत्र पोचली असती आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.
या प्रकरणात सरकार आणि रामदेवबाबा या दोघांनीही आपले हसे आणि अवमूल्यन करून घेतले आहे.