हा पहिल्याने श्री. एकनाथ शिवराम भारदे या गृहस्थांनी १९०१ मध्ये मांडला होता. त्यांचे मुख्य मुद्दे असे होते.
१. ज्ञानेश्वरी - अमृतानुभव - चांगदेवपासष्टी या ग्रंथांमधली भाषा अभंगांपेक्षा वेगळी आहे. मुख्य म्हणजे बरीच जुनी आहे.
२. ज्ञानेश्वरी - अमृतानुभव - पासष्टीमध्ये कुठेही विठ्ठलाचा, पंढरपुराचा उल्लेख नाही.
३. अभंगकर्ते योगी असण्यापेक्षा भक्त असल्याचे जाणवते तर ज्ञानेश्वरीकर्ते (प्रामुख्याने) योगी असल्याचे जाणवते.
४. अभंगकर्ते आळंदी परिसराजवळ राहिले तर ज्ञानेश्वरीकर्ते आपेगाव - पैठण - नेवासे (देवगिरी? ) परिसरात राहिले. आळंदीची समाधीही अभंगकर्त्याची असावी कारण आपेगावातही एका ज्ञानेश्वरांची समाधी आहे. सोनोपंतांचा युक्तिवाद असाः खरोखर ज्ञानेश्वरीकर्त्यांची समाधी आपेगावला म्हणजे पैठणच्या इतक्या जवळ असती तर ते एकनाथांना कळले नसते का? ते काय उगीच आळंदीला आले? आता या असल्या युक्तिवादावर काय बोलणार? एकनाथांच्या काळी ज्ञानेश्वर समाधिस्थ होऊनही २५० - ३०० वर्षे झाली होती. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर जशी सामान्य मनुष्याची दिशाभूल होऊ शकते तशीच एकनाथांचीही झाली असणे शक्य आहे. पण भाविकांशी असा युक्तिवाद करणे कठीण असते.
भारद्यांचे मूळ लेखन मी वाचलेले नाही, पण सोनोपंत दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत या मुद्यांच्या उल्लेख आहे. त्यावेळी वारकरी संप्रदायात या लेखाने बरीच खळबळ माजली होती. टिळकांनी भिंगारकर बुवांच्या मदतीने या मुद्द्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सोनोपंतांनीही निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही हे मुद्दे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना बरेचसे पटण्यासारखे आहेत.
सु. बा. कुलकर्णींचा एक लेख मी महाराष्ट्र टाईम्समध्ये वाचला आहे. पण त्यात कुठलाही पुरावा दिलेला नव्हता, नुसता तर्क करून ज्ञानेश्वर दीर्घायुषी होते (ते प्रौढ होते हे नक्की पण नक्की ८० वर्षांचे आयुष्य सांगायचे तर पुरावा हवा), देवगिरीच्या रामदेवरायाचे (की शंकरदेवरायाचे) राजकवी होते असे म्हटले होते.
एक मात्र नक्की. ज्ञानेश्वरी १६ वर्षांच्या मुलाने लिहिली नाही.
हे कुलकणी म्हणतात तसे ज्ञानेश्वरांचा काळ शके ११२२ ते १२०२ समजला तर "शके बारा शते बारोत्तरे। टीका केली ज्ञानेश्वरे।" हे खोटे आहे की काय? मग ज्ञानेश्वरीचा जन्मवर्ष नक्की कुठले?
बाकी अभंगकर्ते ज्ञानेश्वरही एकापेक्षा जास्त असणे शक्य आहे.
विनायक