ज्ञानेश्वरी,अमृतानुभव,चांगदेवपासष्ठी या ग्रंथांमधली भाषा ही ज्ञानेश्वरांच्या समजल्या जाणाऱ्या अभंगांच्या भाषेपेक्षा पुष्कळच वेगळी आहे हे हे ग्रंथ पहिल्यांदा वाचणाऱ्यालाही जाणवते.इतकेच नव्हे, तर ज्ञानदेवांचे बहुतांशी समकालीन असे नामदेव महाराज यांचीही भाषा कळावयास फार सोपी व आधुनिक मराठीच्या जवळ येणारी वाटते. तसेच ज्ञानेश्वरी,(विशेषतः)अमृतानुभव,चांगदेवपासष्टी यामधून ज्ञानदेवांचे 'योगी' हे स्वरूप अधिक ठसते आणि अभंगात भक्त, या निरीक्षणाशीही पूर्ण सहमत आहे.मुकुंदराजांचा विवेकसिंधूही ज्ञानेश्वरीपेक्षा कळण्यास सोपा वाटतो.
यावर माझ्या अल्पमतीनुसार एक तर्क मनात येतो. अभंग हे भक्तीप्रधान आहेत,त्यावेळच्या तळागाळातल्यांसाठी आहेत.अंधश्रद्धेतून आणि कर्मकांडाच्या अवडंबरातून त्यांना सोडवताना योगाचे अवडंबर माजवणे योग्य नव्हते. 'योगयागविधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म' असे ते स्वतःच म्हणतात. यावरून असे दोन प्रकारचे साहित्य लिहिताना त्यांच्या डोळ्यांसमोर तत्कालीन समाजातले दोन वेगवेगळे वर्ग असावेत असे दिसते. जो वेद, उपनिषदे इ. मध्ये थोडीफार गती असलेला तत्कालीन ब्राह्मणादी विद्वान वर्ग त्यासाठी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि इतरांसाठी साध्यासुध्या भाषेतला साधासुधा भक्तियोग असे काहीसे चित्र असावे.
दुसरे म्हणजे तत्कालीन जातिव्यवस्थाही लक्षात घ्यावी लागेल.ज्ञानेश्वर हे काही झाले तरी उच्च जातीचे, त्यांची भाषा सर्वसामान्यांच्या बोलीभाषेपेक्षा थोडी वेगळीच असणार.जरी त्यांनी गीतेचा भावार्थ 'प्राकृतात'आणण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली तरी ते त्या काळचे उच्च प्राकृत असणार. सामान्य लोकांचे प्राकृत वेगळेच असणार.ज्ञानेश्वरीतल्या मराठीला आपण प्राकृत म्हणत नाही, फारतर आद्यमराठी म्हणतो ही गोष्ट वेगळी. संत नामदेव महाराज हेही बहुजनसमाजातून आलेले त्यामुळे त्यांची भाषा साधीसुधी, सोपी जी आज आपणास जवळची वाटते.आज आपण कृष्ण/विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे आणि ज्योतिबा फुल्यांचे साहित्य वाचले तर हा मुद्दा लक्षात येईल.
अर्थात या मताविषयी ठाम दावा अथवा आग्रह नाही. अनेक वर्षे अनेक प्रकारचे सहित्य वाचल्यानंतर मनात वारंवार येणारे विचार इतकेच त्याचे स्वरूप आहे.