ज्ञानेश्वरांनी वेगवेगळ्या वैचारिक पातळीच्या लोकांसाठी वेगवेगळ्या भाषेत लेखन केले असेल हे पटण्यासारखे आहे. तरीपण मराठी भाषेचा इतिहास बघितला तर तिची उत्क्रांती महानुभवांच्या जवळपास शुद्ध प्राकृतापासून ते एकनाथांच्या संस्कृतप्रचुर मराठीपर्यंत झाली आहे. अर्थात मध्ये मुसलमानी राजवटीमुले अरबी - फारसी शब्दही त्यात आले. पण महानुभाव आणि एकनाथ यांच्यामधला दुवा म्हणून ज्ञानेश्वरांच्या (ज्ञानेश्वरीच्या) संस्कृत - प्राकृतयुक्त मराठीचे महत्त्व आहे. किंबहुना ज्ञानेश्वरांनीच संस्कृत - प्राकृत मिश्रणातून नवीन भाषा उत्पन्न केली असे म्हटले जाते. मुकुंदराजाचा विवेकसिंधू मी वाचलेला नाही. पण तो जर संस्कृतप्रचुर मराठीत असेल आणि जर मुकुंदराजाचा काळ ज्ञानेश्वरांच्या आधीचा असेल तर तो या उत्क्रांतीमधला अडथळा ठरतो. पण मी असे वाचले आहे की नव्या संशोधनानुसार मुकुंदराजाचा काळ सोळाव्या शतकात होऊन गेला, आधी गृहीत धरलेला (ज्ञानेश्वरांच्या आधीचा) काळ चुकीचा आहे. असे असेल तर उत्क्रांतीची संगती लागते.
विनायक