१) सत्य ही कल्पना नाही, सत्य म्हणजे खुद्द आपण!

>सध्यातरी हा बोध मला नसल्याने संकल्पना म्हणतोय. बाकी तुम्ही सांगितलेला प्रयोग नक्कीच करून पाहीन.

= जरूर (आणि लगेच) करा कारण तुम्ही खाली विचारलेल्या प्रश्नाच उत्तर त्यातच आहे!

२) त्याशिवाय मला आपल्याकडून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला आवडेल.

> १. काहीवेळा गणितात जे सिद्ध करायचे आहे, त्याच्या एकदम विरुद्ध हेच खरे आहे असे मानून सुरुवात करतात व प्रोसेस केल्यानंतर ते खोटे आहे हे सिद्ध करतात. निष्कर्ष : याच्याउलट खरे आहे हा असतो.

मला (आम्हाला) सत्याची जाण नसल्याने चुकीची सुरुवात केलेली असेल, म्हणजेच जे सत्य नाही तेच सत्य समजून सुरुवात केली असेल. वरील गणिताच्या गृहीतकाप्रमाणे त्याचा फोलपणा कळणे म्हणजेच सत्य समजणे असे होईल काय? यावर प्रकाश टाकावा.

= कळस, अशी शेकडो चुकीची गृहितकं आहेत आपण एकेक गृहितक घेऊन त्याचा पाठपुरावा करायचा म्हटला तर हा जन्म संपेल आणि पुढल्या जन्मात आपली भेट होईल याची शाश्वती नाही.

उदा. बायको ही कल्पना आहे पण ती खरंच आपली पत्नी आहे असं मानल्यामुळे आपण तिच्याशी ज्याम जोडले गेलोय. या एका कल्पनेतून संसार जवाबदारी आणि ओझं झालाय. तुम्ही फक्त बायकोही कल्पना आहे हा बोध सघन करा, एका झटक्यात तुमचे सगळे संसारिक प्रश्न सुटतील, न बायको बदलायची गरज न संन्यास घेण्याची, तुम्ही एकदम मोकळे व्हाल आणि राहतं घर तुम्हाला स्वास्थ्यदायी होईल, स्वत:च्या घरात तुम्हाला सहलीला आलोत असं वाटायला लागेल!

तुम्ही स्वत:ला सत्य मानू नका, तुम्ही फक्त चुकीच्या धारणा काय आहेत त्या समजावून घ्या, त्यातनं मोकळे व्हा. मी त्यासाठी तुफानी अभ्यास केलाय आणि तुम्हाला एकदम सोपं करून सांगतोय.

मला अध्यात्म मजेशीर करायचंय तो काही गहन विषय नाही. मग या हसत खेळत चाललेल्या प्रयोगात तुम्हाला एक दिवस (किंवा या क्षणी) सहज उलगडा होईल की अरे! सगळ्या कल्पना असू शकतील पण फक्त एकच गोष्ट कल्पना असू शकत नाही आणि ती म्हणजे आपण! झाला सत्याचा बोध! आलात तुम्ही कल्पनेकडून सत्याकडे!

>२. सत्य जाणलेल्या व्यक्तीला स्वप्ने पडतात काय? मृत्यूची भीती गेल्याने भीतिदायक स्वप्ने कमी पडतात का? स्वप्नांचे विषय काय असतात

= स्वप्न आणि विचार हा मनाचा दृकश्राव्य आहे, अदृश्य विचारांना आपण विचार म्हणतो आणि दृष्य विचारांना स्वप्न.

विचारांची अहर्निशता कमी झाली की निराकार दिसायला लागतो, म्हणजे सिनेमात जशी अनेक स्थिरचित्रं अत्यंत वेगानी डोळ्यासमोर सरकवल्यानी हालचालीचा भास होतो आणि सुरुवातीला समोर आणि स्पष्ट दिसणारा पडदा एकदम सिनेमा संपल्यावरच दिसतो तसं ते आहे!

जीवनातल्या सर्व भीतीचं कारण निराकाराचा बोध नसणं आहे. त्यामुळे सत्यशोधनाच्या दोनच पायऱ्या आहेत, एक, निराकार दिसणं आणि दोन, आपणही मुळात निराकार आहोत हा बोध होणं. एकदा आपण निराकार आहोत हे कळलं की भीती संपली कारण निराकाराला काहीही होत नाही!

तुम्ही हे असे निर्वैयक्तीक आणि रोजच्या जगण्यातले प्रश्न विचारताय या बद्दल मी देखील तुमचा आभारी आहे कारण तुमच्याशी संवाद साधताना मलाही सॉलिड मजा येतेय.

संजय