हा लेख म्हणजे टाइम मशीनच वाटला. स्वतःच्याच भूतकाळात शिरता आले. अगदी दहा पंधरा किलो नाही तरी पाच किलोपर्यंत बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या चिकवड्या अशी सोपी वाळवणे केलेली आहेत. त्याशिवाय मिरच्या संकेश्वरी, ब्याळगी अशा दोन प्रकारच्या वेगवेगळ्या वाळवून त्यांचे तिखट करणे,(तेव्हा संकेश्वरी मिरची महाग असे कारण ती तिखट असल्याने थोडीशीच पुरे.) हळकुंडे धुवून खडखडीत वाळवणे,वाल,चिंच, तूरडाळ,गहू,तांदूळ इ. वर्षभराचे साठवताना आवश्यक ते एरंडेल, कडुलिंबाचा पाला, बोरिक पावडर इ.चा साठा करून ठेवणे वगैरे सगळी धामधूम असे. पापडांमध्ये ओल्या मिरच्यांचे पापड (स्वच्छ सफेद रंग यावा म्हणून), मिऱ्याचे पापड वगैरे शोभिवंत प्रकार असतच.वैशाखात लोणची उरकून घ्यायची कारण कोंकणपट्टीत पाऊस लवकर येतो.सोसाट्याचा वारा सुरू झाला की झाडावर आंबा राहत नाही. एरवीही होळी झाली की लागलीच वाळवणाला सुरुवात करावी लागे कारण नंतर सावट येई.अजूनही येतेच, पण आता वाळवणे नसतात त्यामुळे फिकीर नसते.कोंकणातले उन्हाळ्याचे आणखी एक काम म्हणजे आमसुले करणे. मोठे जिकीरीचे आणि खटाटोपाचे काम. ह्याचे वाळवण महिनाभर तरी चाले. त्याशिवाय काही ठिकाणी रातांब्यांच्या बियांपासून तेलही काढले जाई.

वाळवणाआधी अंगण सारवून घेतले जाई. तसे ते एरवीही पंधरावीस दिवसांनी सारवावेच लागे. वाळवणाच्या दिवसांत सर्वात प्रथम त्या भल्यामोठ्या अंगणाचा केर काढायचा. उपासाची वाळवणे असतील तर प्रथम न्हाणीघरात पाणी तापत ठेवायचे आणि घरातल्या कर्त्या बायकांनी केस धुवून घ्यायचे.  

हा काही अतिप्राचीन भूतकाळ नव्हे,पण आता फार दूरचा, रिमोट वाटतोय. आणि फारशी स्मरणरम्यताही वाटत नाहीय.जीवनशैली झपाट्याने बदललीय, बदलतेय ते एका अर्थी चांगलेच आहे.जुने रंग, गंध, स्वाद नाहीसे झाले तरी त्यांची जागा नवनवीन रूप, रंग, गंध, स्वादांनी भरून काढली आहे.खूप वैविध्य, वैचित्र्य उपलब्ध आणि आवाक्यात आहे. एका अर्थी लयलूट आहे रंग,रूप,रुचीची.